हैदराबाद - देशातील विद्वेषाचे वातावरण संपविण्याची आवश्यकता असून त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता केंद्रात सरकारचा पराभव करणे आवश्यक आहे, असे काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.
तेलंगणातील नामपल्ली येथे प्रचारसभेत ते म्हणाले की, मी केंद्र सरकारविरोधात देत असलेल्या लढ्यामुळे माझ्यावर विविध राज्यांमध्ये २४ खटले दाखल करण्यात आले. त्या खटल्यांसंदर्भात मला न्यायालयांकडून नेहमी समन्स येत असतात.बदनामीच्या खटल्यात मला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. माझे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते. केंद्र सरकारने माझे शासकीय निवासस्थानही काढून घेतले. पण या गोष्टींनी मी अजिबात डगमगलो नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
ओवैसी यांच्यावर किती खटले आहेत?राहुल गांधी म्हणाले की, माझ्यामागे ईडी, सीबीआयसहित अन्य सरकारी यंत्रणांचा भुंगा लागलेला असतो. मात्र ओवैसी यांची एका तरी सरकारी यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे का, असा सवाल त्यांनी केला.
सोनिया यांचा व्हिडीओ संदेश - तेलंगणात काँग्रेसला विजयी करा, असे आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी केले. त्यांनी सांगितले की, उत्तम व प्रामाणिक सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे. - त्यासाठी मतदारांनी काँग्रेसला विजयी करावे. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचा पक्ष प्रयत्नशील असणार आहे, असेही सोनिया गांधी आपल्या दोन मिनिटांच्या व्हिडीओ संदेशात म्हटले.