लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लहानपणी माझा वडिलांनी लैंगिक छळ केला होता, असे खळबळजनक वक्तव्य दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी केले आहे. त्या घटनेने माझ्या मनावर मोठा आघात झाला होता. अशा घटनांतूनच महिलांच्या हक्कांसाठी लढण्याचा मी कालांतराने निर्धार केला, असेही त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्ली महिला आयोगातर्फे कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या कार्यक्रमात स्वाती मालिवाल यांनी सांगितले की, लहानपणी वडील लैंगिक छळ करत असत. मी इयत्ता चौथीत असेपर्यंत हे प्रकार घडत होते. वडील मला खूप मारायचे. ते टाळण्यासाठी मी पलंगाखाली लपून राहत असे. महिला, मुलांचा लैंगिक छळ करणाऱ्यांना मी धडा शिकवेन असा विचार मी तेव्हा करायचे. त्यातूनच मी महिलांच्या हक्कांसाठी लढा देण्याकरिता सज्ज झाले. आई, मावशी, आजी-आजाेबा यांच्या आधारामुळेच यातून बाहेर पडू शकले, असे त्या म्हणाल्या.
खुशबू सुंदर यांनीही सांगितली होती व्यथा
अभिनेत्री खुशबू सुंदर यांनीदेखील वडिलांच्या गैरवर्तनाबद्दल गौप्यस्फोट केला होता. बालपणी वडिलांनी माझे लैंगिक शोषण केले होते. याबाबत त्यावेळी मी आईला काहीही सांगितले नव्हते. कारण तिचा कदाचित विश्वास बसला नसता, असे खुशबू यांनी सांगितले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"