रांची/नवी दिल्ली : मुख्यमंत्रिपदावर असताना माझा अपमान झाला. सर्व पर्याय खुले आहेत, असे सांगत झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई साेरेन यांनी झारखंड मुक्ती माेर्चातून बाहेर पडण्याचे संकेत दिले.
साेरेन यांनी ‘एक्स’वरील आपल्या खात्यातून पक्षाचा उल्लेख काढून टाकला. त्यानंतर ते दिल्लीत पाेहाेचले. एका पाेस्टमध्ये त्यांनी सांगितले की, माझे सार्वजनिक कार्यक्रम अचानक पक्ष नेतृत्वाने स्थगित केले. आमदारांची ३ जुलैला बैठक हाेती. ताेपर्यंत मुख्यमंत्री म्हणून काेणत्याही कार्यक्रमात जाऊ शकत नाही, असे सांगण्यात आले.
आमदारांची बैठक बाेलविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. मात्र, माझा राजीनामा मागण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असे ते म्हणाले. दिल्लीला पोहोचल्यावर ते म्हणाले, मी भाजपच्या कोणत्याही नेत्याला भेटलाे नाही.