मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांचा राजकारणातून संन्यास; म्हणाले, "पराभवातून घेतला धडा"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 03:55 PM2021-12-16T15:55:48+5:302021-12-16T15:56:59+5:30
E Sreedharan : राजकारणाला रामराम ठोकताना ई. श्रीधरन यांनी मलप्पुरममध्ये म्हटले की, मी कधीच राजकारणी नव्हतो.
केरळ : केरळच्या पलक्कड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या (BJP) तिकिटावर निवडणूक लढवणारे मेट्रोमॅन ई. श्रीधरन (Metro Man E Sreedharan) यांनी गुरुवारी राजकारणातून संन्यास घेतला. निवडणुकीतील पराभवातून मी धडा घेतला आहे, असे ई. श्रीधरन म्हणाले. तसेच, राजकारणाला रामराम ठोकताना ई. श्रीधरन यांनी मलप्पुरममध्ये म्हटले की, मी कधीच राजकारणी नव्हतो.
देशामध्ये मेट्रोमॅन म्हणून नाव मिळवलेले ई. श्रीधरन हे भाजपाने पलक्कड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करत भाजपाने केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली होती. मात्र, त्यांना निवडणूक जिंकता आली नाही. दरम्यान, गुरुवारी त्यांनी राजकारणाला अलविदा केला आहे.
ई. श्रीधरन म्हणाले की, माझे वय आता 90 वर्षे झाले आहे. अशा परिस्थितीत राजकारणात करिअर करणे किंवा ते पुढे चालू ठेवणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे राजकारणात राहण्याचे माझे स्वप्न नाही आहे. याचबरोबर, राजकारणातून संन्यास घेताना श्रीधरन म्हणाले की, मला माझ्या भूमीची सेवा करण्यासाठी राजकारणाची गरज नाही. मी हे आधीच तीन ट्रस्टच्या माध्यमातून करत आहे. आता माझ्यासाठी राजकारण सोडलेलेच चांगले आहे.
मेट्रो प्रकल्पांमध्ये ई. श्रीधरन यांचे मोठे योगदान
दरम्यान, ई. श्रीधरन यांच्या कुशल नेतृत्वामुळे दिल्ली मेट्रोचे स्वप्न साकार झाले होते. कोकण रेल्वेसारखा अवघड प्रकल्पही ई. श्रीधरन यांच्या कौशल्यामुळे प्रत्यक्षात उतरला होता. ई. श्रीधरन यांच्या या कार्याचा गौरव भारत सरकारने पद्मविभूषण, पद्मश्रीसारखे पुरस्कार देऊन केला आहे. दिल्ली मेट्रोप्रमाणेच कोलकाला मेट्रो, कोची मेट्रोसह देशातील अनेक मोठ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये ई. श्रीधरन यांचे योगदान राहिले आहे. त्यामुळेच त्यांचा भारताचे मेट्रोमॅन म्हणून आदराने उल्लेख केला जातो.