होय मी साक्षीदार आहे, 'त्या' नर्सने सांगितली राहुल गांधींच्या जन्माची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 08:33 PM2019-05-03T20:33:11+5:302019-05-03T20:34:08+5:30
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अधिकाधिक धारदार आणि वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे.
वायनाड - भाजपाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या नागरिकत्वाच्या प्रश्नावरून थेट लक्ष्य केले होते. कुठले राहुल गांधी खरे आहेत, लंडनमधले की लुटियन्समधले? सवाल भाजपाने उपस्थित केला. तसेच राहुल गांधी भारतात जन्मलेच नसल्याचे काही नेत्यांनी म्हटले. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या जन्माचा पुरावा देण्यासाठी चक्क नर्सनेच पुढाकार घेतला आहे. राजम्मा ववाथील असे या नर्सचे नाव आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अधिकाधिक धारदार आणि वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. नागरिकत्वाच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र, राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी भाजपाला जोरदार प्रत्युत्त देताना भाजपाने केलेले आरोप म्हणजे निव्वळ बकवास आहे, असा टोला लगावला. राहुल गांधी याचा जन्म भारतातच झाला. तसेच त्यांचे संगोपनही येथेच झाले. राहुल गांधी हे भारतीच आहेत हे संपूर्ण देश जाणतो, असे प्रियंका गांधींनी म्हटले आहे.
वायनाड मतदारसंघातील मतदार आणि निवृत्त परिचारिका राजम्मा ववाथिक यांनी राहुल गांधींच्या जन्माची गोष्ट सांगितली आहे. राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत कुणीही शंका घेऊ शकत नाही, असे राजम्मा यांनी म्हटले आहे. दिल्लीतील होली रुग्णालयात 19 जून 1970 रोजी असलेल्या परिचारिकांच्या स्टाफपैकी त्या एक सदस्य होत्या. विशेष म्हणजे राहुल यांना पहिल्यांदा हातात घेण्याचा मानही त्यांना मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल यांच्या जन्माची मी साक्षीदार असून त्या जन्मलेल्या बाळाला पहिल्यांदा हाती घेण्याचा मान काही निवडणकांमध्ये मलाही मिळाला होता. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते, असे राजम्मा यांनी सांगितले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नातवाला पाहण्यासाठी मी आणि माझ्यासह रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ उत्सुक होता. त्या घटनेला आज 49 वर्षे झाली आणि राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मी वायनाड येथील रहिवासी असून मला आजही तो प्रसंग डोळ्यासमोर दिसतो, आठवतो, असे राजम्मा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, 72 वर्षीय राजम्मा त्यावेळी एक प्रशिक्षणार्थी परिचारिका म्हणून तेथे रुजू झाल्या होत्या. मात्र, आजही राहुल गांधींच्या जन्माची कथा त्या आनंदाने सांगतात. तसेच, भाजपा नेत्यांनाही त्यांनी चपराक लगावली असून राहुल गांधींच्या जन्माचे पुरावे आजही दिल्लीच्या होली रुग्णालयात असल्याचे राजम्मा यांनी म्हटले आहे.