“काँग्रेसमध्ये राहून मी २२ वर्षे वाया घालवली..,” आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 23:29 IST2022-12-01T23:28:48+5:302022-12-01T23:29:22+5:30
काँग्रेसमध्ये राहून तुम्ही कायम एकाच कुटुंबाची पूजा करत असता, पण भाजपात तुम्ही देशाला पूजता, असं वक्तव्य आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलं.

“काँग्रेसमध्ये राहून मी २२ वर्षे वाया घालवली..,” आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला होता. दरम्यान, बोलताना त्यांनी आपण काँग्रेसमध्ये २२ वर्षे वाया घालावली असं मोठं वक्तव्य केलं. काँग्रेसमधून भाजपत येणं हे कोणती विचारधारा बदलण्यासारखं नव्हतं. काँग्रेसमध्ये असताना तुम्ही एका कुटुंबाची पूजा करता, परंतु भाजपत तुम्ही संपूर्ण देशाला पूजता, असं ते म्हणाले. हिमंता बिस्वा सरमा यांनी २०१५ मध्ये काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर पक्षानं विजयानंतर त्यांना आसामचं मुख्यमंत्री केलं.
“सामान्यतः हिंदू दंगलीत सहभागी होत नाहीत,” असं वक्तव्य सरमा यांनी यावेळी बोलताना केलं. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
लव्ह जिहादवरही भाष्य
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लव्ह जिहादवरही मोठं वक्तव्य केलं. “लव्ह जिहाद हे आजच्या समाजातील मोठं सत्य आहे. याला नाकारता येणार नाही. राष्ट्रीय दृष्टीकोनातून लव्ह जिहाद हा एक मोठा मुद्दा आहे. श्रद्धा वालकर प्रकरणही लव्ह जिहादचाच परिणाम आहे. आरोपी अफताबनं पॉलिग्राफ टेस्टमध्ये ही गोष्ट मानली की श्रद्धाला मृत्यूनंतर जन्नत मिळेल. त्याच्या या वक्तव्याबद्दल अनेक मीडिया रिपोर्ट्सही आहेत,” असेही ते म्हणाले.