कर्नाटकातील देवेगौडांच्या आमदार मुलगा आणि खासदार नातवाच्या सेक्स स्कँडलप्रकरणी मोठी अपडेट आली आहे. हजारो व्हिडीओ लीक झाल्याच्या महिनाभरानंतर प्रज्वल रेवन्नानी एक व्हिडीओ जारी केला आहे. परदेशात फरार झालेल्या रेवन्ना यांनी आपण ३१ मे रोजी एसआयटीसमोर हजर होणार असल्याचे म्हटले आहे. माजी पंतप्रधान असलेले आजोबा देवेगौडा यांनी प्रज्वलना पत्र लिहीत चौकशीला सामोरे जाण्याची ताकीद दिली होती. यानंतर आता नातवाचा व्हिडीओ आला आहे.
या व्हिडीओमध्ये प्रज्वलनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. आपल्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मला न्यायालयावर विश्वास आहे आणि मी या खोट्या प्रकरणांतून बाहेर येणार आहे. हा एक राजकीय कट असल्याचा आरोप प्रज्वल रेवन्नानी केला आहे. तसेच देवाचा, कुटुंबाचा आणि जनतेचा आशिर्वाद माझ्यावर असुदे. मी भारतात येऊन हे सर्व संपविण्याचा प्रयत्न करणार आहे. मी सर्वांची माफी मागतो, असे रेवन्ना म्हणाले.
मी तुमच्यासमोर माहिती देण्यासाठी आलो आहे. कारण मी परदेशात कुठे आहे हे सांगितले नव्हते. माझ्या एक्स अकाऊंटवरून आणि वकिलांच्या माध्यमातून एसआयटीच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी एका आठवड्याची वेळ मागितली होती. वेळ मागूनही त्याच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी आणि त्यांच्या नेत्यांनी माझ्याबाबत वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. हे सर्व पाहून मी डिप्रेशन आणि एकटेपणात गेलो होतो. यामुळे मी समोर येऊ शकलो नाही. माझ्याच मतदारसंघातील काहींनी हा कट रचला आहे. मला राजकीय क्षेत्रात खाली खेचण्यासाठी सर्व एकत्र आले आहोत. या सर्व गोष्टी पाहून मला धक्का बसला होता आणि मी यापासून लांब राहिलो होतो, असे रेवन्ना यानी या व्हिडीओत म्हटले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून प्रज्वल रेवण्णा यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे. १ मे रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून प्रज्वल रेवण्णा यांना जारी केलेला डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करून तो परत करण्याचे निर्देश परराष्ट्र व्यवहार आणि गृह मंत्रालयाला द्यावेत अशी विनंती केली होती. रेवण्णा सेक्स स्कँडल उघड झाल्यानंतर प्रज्वल यांनी देश सोडला होता. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे.