नवी दिल्ली - राजस्थानच्या हनुमान गड जिल्ह्यातील एक छोटंसं गाव संगरिय...संध्याकाळची वेळ होती जेव्हा या गावातील एका घरात टीव्हीवर अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम सिनेमा लागला होता. सहावीच्या वर्गात शिकणारा याच घरातील मुलगा त्याच्या वडिलांसह सिनेमा पाहायला बसला होता. तेव्हा एक सीन येतो, जेव्हा सिनेमातील हिरोईन राधा तिच्या गावात परतते, तिचा खूप सन्मान केला जातो. सिनेमा पाहणाऱ्या या मुलाने वडिलांना विचारलं. तिचं इतकं कौतुक का करतायेत? तेव्हा वडील सांगतात, ती कलेक्टर बनलीय. त्यावेळी मुलाने मी पण एक दिवस कलेक्टर बनणार असं उत्तर दिलं.
मुलाच्या या उत्तराकडे वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांनीही दुर्लक्ष केले. कारण या वयात त्याला कलेक्टर शब्दाचा अर्थही माहिती नव्हता. मात्र राहुल शर्मा नावाच्या या मुलानं कलेक्टर बनण्याची जिद्द उराशी बाळगलं. काळ बदलला. १२ वीच्या शिक्षणानंतर राहुलनं आयआयटीत प्रवेश घेतला. त्याठिकाणी तो सिव्हिल इंजिनिअरींग करत होता. मात्र त्याचे लक्ष यूपीएससी परीक्षेवर होतं. आयआयटीत शिकत असताना राहुल अशा मुलांना भेटला जे यूपीएससीची तयारी करत होते. त्यांच्याशी तो चर्चा करायचा. कलेक्टर बनण्याचं स्वप्न राहुलनं बालपणीच पाहिलं होते.
अती आत्मविश्वास नडला...
२०२० मध्ये राहुलनं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर यूपीएससी तयारीला लागला. UPSC तयारी करताना राहुलला अती आत्मविश्वास होता. परीक्षेत त्याला उत्तम मार्क्स मिळतील. चांगली कामगिरी करेल असं त्याला वाटायचे. पहिल्याच प्रयत्नात आपण यशस्वी होऊ असं त्याला वाटायचे. त्यामुळे हाच अती आत्मविश्वास त्याची सर्वात मोठी चूक बनली. प्रीलिम्समध्ये तो फेल झाला. काही प्रश्नांची उत्तरेही त्याला देता आली नाहीत.
मुख्य परीक्षेच्या ६ दिवसांआधीच डेंग्यू झाला...
पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरल्यामुळे राहुल खचला होता. त्याने पुढील एक आठवडा आपण कुठे कमी पडलो त्याचं निरिक्षण केले. युपीएससी देण्याची त्याची जिद्द कायम होती. पुन्हा एकदा जोमाने तो तयारीला लागला. परंतु नशिबानं साथ दिली नाही. दुसऱ्या प्रयत्नात राहुलनं प्रीलिम्स पास केली. परंतु मुख्य परीक्षेच्या ६ दिवसांपूर्वीच त्याला डेंग्यू झाला. त्यामुळे राहुलला परीक्षेपासून वंचित राहावे लागले.
सोशल मीडियापासून दूर, १०-१२ तास अभ्यास
पुढील वर्षी राहुलने पुन्हा तयारी सुरू केली आणि यूपीएससी परीक्षा दिली. तिसऱ्या प्रयत्नात राहुलने त्याच्या रणनीतीत बदल केला. अभ्यासाचं नियोजन करत टाईमटेबल बनवलं. त्यात सोशल मीडियापासून तो दूर राहिला. एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत राहुलनं स्वत:ला अभ्यासात गुंतवून ठेवलं. कुठल्याही परिस्थितीत त्याला यंदा यश मिळवायचं होतं. दिवसाला कमीत कमी १०-१२ तास तो अभ्यास करत होता. अखेर त्याच्या प्रयत्नाला यश मिळालं. तिसऱ्या प्रयत्नात राहुल शर्मा UPSC परीक्षेत पास झाला आणि देशात ६२८ वा क्रमांक मिळवला. तिसऱ्या प्रयत्नात यश मिळालं परंतु मुलाखतीत कमी मार्क्स मिळाले. राहुलचं इंग्रजी चांगले नसल्याने त्याची मुलाखत वाईट झाली. पर्यायी गणित विषयात त्याने चांगली कामगिरी केली.