सुरत - गुजरातमधीलकाँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे वृत्ताचे खंडन केले. माझ्या माणसांसाठी माझी लढाई सुरूच राहील मात्र मी काँग्रेस सोडणार नाही आणि काँग्रेसला पाठिंबा कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट मत काँग्रेसमध्ये नाराज असलेले आमदार अल्पेश ठाकोर यांनी मांडले. शुक्रवारी दिल्लीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि गुजरात काँग्रेसचे प्रभारी खासदार राजीव सातव यांची अल्पेश ठाकोर यांनी भेट घेतली. या भेटीनंतर ते माध्यमांसमोर बोलत होते.
शुक्रवारी गुजरात काँग्रेसच्या 2 आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. यामध्ये तीन वेळा निवडून आलेले जुनागढ जिल्ह्यातील माणावदर विधानसभेचे आमदार जवाहर चावडा यांचा समावेश आहे. तसेच सुरेंद्र नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पुरूषोत्तम साबरिया यांनीही आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश घेतला.
गुजरात काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या कारभारावर अल्पेश ठाकोर यांनी नाराजी व्यक्त केली. युवकांना पक्षात योग्य संधी मिळाली पाहिजे, मला पक्षाकडून योग्य तो मानसन्मान मिळेल याची खात्री आहे. मात्र ज्या समाजातून मी पुढे येतो अशा ठाकोर समाजासाठी मी अनेक मागण्या केल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप अल्पेश ठाकोर यांनी केला.