Assam chief minister Himanta Biswa Sarma : नवी दिल्ली : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या लोकसभा निवडणुकीपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसला मतदान करून फायदा नाही, कारण कोणी जिंकला तरी तो भाजपामध्ये जाईल, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे लोक काँग्रेसमध्ये राहतील की नाही, याबाबत शंका आहे, कारण प्रत्येकाला भाजपामध्ये यायचे आहे, असेही हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. आसाममधील करीमगंज जिल्ह्यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेसचा कोणताही उमेदवार पक्षात राहू इच्छित नाही, प्रत्येकाला भाजपामध्ये सामील व्हायचे आहे. एक सोडून काँग्रेसमध्ये विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना मी भाजपामध्ये आणणार आहे, असेही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.
दरम्यान, हा एक नेता कोण आहे? याबाबत हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्तेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करतील. राज्यातील अल्पसंख्याकांच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत. अल्पसंख्याक आम्हाला मतदान करतील.
ईशान्येत भाजपा शानदार विजय नोंदवेल : मुख्यमंत्री सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील युती आगामी निवडणुकीत ईशान्येकडील लोकसभेच्या 25 पैकी 22 जागा जिंकेल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी सांगितले होते. येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना हिमंता सरमा म्हणाले की, आसाममधील 14 जागांपैकी सध्या फक्त तीन जागा अनिश्चित आहेत.