नवी दिल्ली-
भाजपसोबत परत जाण्याच्या प्रश्नावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. आपण आता भाजपसोबत कधीही जाऊ शकत नाही. एकवेळ मरण पत्करणं मान्य आहे, पण भाजपसोबत जाऊ शकत नाही, असं नितीश कुमार म्हणाले. त्यामुळे जे लोक भाजपासोबत पुन्हा जाणाच्या हवेतील चर्चा करत आहेत, त्यांनी आता अशा चर्चा करणं थांबवावं. कारण आता भाजपसोबत जातील असा प्रश्नच उद्भवत नाही, असंही नितीश कुमार म्हणाले. विशेष म्हणजे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा न जाण्याचा निर्धार केला आहे.
भाजपच्या या प्रस्तावाला उत्तर देताना नितीश कुमार यांनी हे विधान केलं आहे. यासोबतच नितीश कुमार यांनी भाजपवर लालू प्रसाद यादव यांना अडकवल्याचा आरोपही केला आहे. दुसरीकडे, बिहार भाजप युनिटचे अध्यक्ष संजय जयस्वाल म्हणाले की, संपूर्ण राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
नितीश यांच्याकडून धोका आता पुन्हा नाही- जयस्वालबिहारचे मुख्यमंत्री कुमार यांचा पक्ष जनता दल-युनायटेड (JDU) ने भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. संजय जयस्वाल म्हणाले, “आम्ही नितीश कुमार यांच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याच्या पक्ष कार्यकर्त्यांमधील अफवा संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांची वृत्ती कधी इकडे तर कधी तिकडे अशी राहिली आहे, पण आम्ही पुन्हा त्यांच्याकडून फसणार नाही"
नितीश यांनी पंतप्रधानांचा विश्वास तोडला - जयस्वालसंजय जयस्वाल म्हणाले, नितीश कुमार हे काही लोकप्रिय नाहीत. जेडीयूने २०२० च्या विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरी केली, तर आमची कामगिरी चांगली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा निर्णय घेऊन औदार्य दाखवले आणि नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण, नितीश कुमार सवयीनं अविश्वासू आहेत. नितीश कुमार यांनी पंतप्रधानांनी टाकलेल्या विश्वासाचा गैरवापर केला.