मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना मी चूक केली नाही, मी माफी मागणार नाही असे म्हटले. आपल्या आक्रमक भाषणात बोलताना, राहुल यांनी मोदी आणि अमित शहांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. नोटाबंदी, देशातील महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यांवरुन राहुल यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. तसेच, मै मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा, असे राहुल यांनी भाजपा नेत्यांना प्रत्युत्तर दिलं.
राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेत्यांनी संसदेत केली होती. मात्र, मी कदापी माफी मागणार नसल्याचे राहुल यांनी स्पष्ट केलंय. माझं नाव राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे, त्यामुळे मी माफी मागणार नसल्याचं राहुल यांनी म्हटले. तसेच, माफी मागायची असेल तर मोदींचे असिस्टंट असलेल्या अमित शहांनी माफी मागावी, असेही राहुल यांनी म्हटले. दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसकडून मोदी सरकारच्या विरोधात भव्य रॅली काढण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक, महिलांवरील अत्याचार, आर्थिक मंदी आणि अन्य मुद्द्यावरुन काँग्रेस या रॅलीच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधणार आहे. रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. देशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहनसिंग आणि प्रियंका गांधी यांच्यासह अन्य दिग्गज नेते सहभागी झाले आहेत.
काँग्रेस नेत्या सरचिटणीस प्रियंका गांधी, मनमोहनसिंग यांच्या भाषणानंतर राहुल गांधींनी भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी, मोदी सरकार हे अदानी आणि अंबानींसाठी काम करत असल्याचा आरोप राहुल यांनी केली. देशाची अर्थव्यवस्था मोदींनी नष्ट केली असून जे काम शत्रुंनी केलं नाही ते मोदींनी केलं आहे, असेही राहुल गांधींनी म्हटले. गेल्या 45 वर्षात सर्वात मोठी बेरोजगारी मोदी सरकारच्या काळात आली आहे, असे म्हणत मोदी आणि अमित शहांवर हल्लाबोल केला. रेप इन इंडिया या वक्तव्यावरुन भाजपा नेत्या आणि मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना माफी मागण्याचे आवाहन केले होते. मात्र, मोदींच्या भाषणाचा संदर्भ देत मी कधीही माफी मागणार नसल्याचे राहुल यांनी म्हटले. मै मर जाऊंगा लेकीन माफी नही मांगुंगा, असे राहुल यांनी म्हटले.
दरम्यान, रामलीला मैदानात काँग्रेसच्या या रॅलीसाठी भव्य पोस्टर्स लावण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते या भव्य रॅलीला उपस्थित आहेत. तसेच देशाच्या प्रत्येक राज्यातून काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीत सहभागी आहेत. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविधेयक आणि महिलांवरील अत्याचार असे अनेक मुद्दे घेऊन काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलंय.