ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी फुकट खटला लढण्याची तयारी दर्शवली आहे. केजरीवालांनी जेठमलानींची 4 कोटी रुपयांची फी भागवण्यासाठी जनतेचा पैसा वापरल्याचा आरोप भाजपाने केला होता.
त्यावर, मी केवळ श्रीमंतांकडून खटला लढण्यासाठी फी आकारतो, गरिबांसाठी मी फुकटात लढतो. माझ्या उलटतपासणीला घाबरलेल्या केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचा यामागे हात आहे. असं जेठमलानी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
जर केजरीवाल सरकारनेही पैसे दिले नाहीत, तर आपण फुकटात खटला लढण्यास तयार आहोत, असं जेठमलानी म्हणाले.
जेठमलानी यांनी आतापर्यंतच्या न्यायालयीन लढाईसाठी 3.42 कोटी रुपयांचे बिल लावले आहे. जेठमलानी यांनी रिटेनरशीपची फी 1 कोटी रुपये त्यानंतर कोर्टात प्रत्येक सुनावणीला हजर राहण्यासाठी 22 लाख रुपये आकारले आहेत. जेठमलानी आतापर्यंत 11 सुनावण्यांना केजरीवालांचे वकिल म्हणून कोर्टरुममध्ये हजर होते. या सुनावणीची आतापर्यंतची फी 3.42 कोटी झाली आहे. अजून साक्षीदारांची उलट तपासणीही झालेली नाही.I charge only the rich but for poor I work for free. All this is instigated by Mr.Jailtley who"s afraid of my cross-examination-Jethmalani pic.twitter.com/GnKjDq0pv4— ANI (@ANI_news) April 4, 2017
काय आहे प्रकरण-
अरुण जेटलींच्या 13 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत डीडीसीए म्हणजे म्हणजेच ‘दिल्ली अँड डिस्ट्रिक्टस क्रिकेट असोसिएशन’ हे आर्थिक गैरव्यवहाराचं माहेरघर बनल्याचा मुख्य आरोप कऱण्यात आला होता. भ्रष्टाचारी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करुनही जेटलींनी कधीही कारवाई केली नाही असाही आरोप जेटलींवर करण्यात आला होता. त्यावर जेटली यांनी डिसेंबर 2015 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आप नेते कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चड्डा आणि दीपक बाजपेयी यांच्याविरोधात 10 कोटींचा मानहानी खटला दाखल केला. हा आरोप सिद्ध करा किंवा माफी मागा अन्यथा मानहानी खटल्याला सामोरं जा, असा इशारा जेटलींना दिला होता. त्यानंतर केजरीवालांनी माफी न मागितल्यामुळे जेटलींनी कोर्टात धाव घेतली