नवी दिल्ली - काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी लोकांवर जबरदस्ती केल्याचा आरोप जेएनयूच्या माजी उपाध्यक्ष विद्यार्थी नेत्या शेहला रशीद हिने केला होता. ते आरोप भारतीय लष्कराने फेटाळून लावले होते. आज जंतरमंतरवर प्रदर्शन करण्यासाठी आलेल्या शेहला रशीद यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारण्यासाठी घेरलं होतं. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शेहला यांनी जर या प्रकरणाची चौकशी होणार असेल तर मी पुरावे द्यायला तयार आहे असा दावा केला आहे.
शेहला रशीद यांनी यावेळी सांगितले की, मी माझं मत यापूर्वी मांडले आहे. भारतीय लष्कर जर याची चौकशी करणार असेल तर मी त्यांना पुरावे देऊ शकते. मी आरोप केला आहे मात्र या प्रकरणाची चौकशी सुरू होणार आहे का? का माझ्याविरोधात चौकशी सुरु आहे. त्यानंतर पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता शेहला रशीद त्याठिकाणाहून निघून गेल्या.
शेहला रशीद हिने काश्मीरमधील परिस्थितीवरून केलेले आरोप भारतीय लष्कराने फेटाळून लावले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयामधील वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी शेहला रशीदविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसेच शेहला रशीद यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी श्रीवास्तव यांनी केली होती.
शेहला रशीद ही स्वत: काश्मिरी असून, श्रीनगर येथील रहिवासी आहे. केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून ती सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, रविवारी शेहला हिने एकापाठोपाठ एक खोटे ट्विट करून काश्मीरमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचा दावा केला होता. तसेच लष्कर आणि पोलीस घरांमध्ये घुसून स्थानिकांना त्रास देत आहेत. तसेच शोपियाँ येथे लष्कराने काही जणांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्रास दिल्याचा आरोप शेहला रशीद यांनी केला होता. मात्र हे आरोप लष्कराने तत्काळ फेटाळून लावले.
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शेहला रशीदने आयएएस अधिकारीपासून नेता बनलेले शाह फैसल यांची पार्टी जॉईन केली होती. शेहला श्रीनगरमधील रहिवाशी आहे. कलम 370 हटविण्याच्या निर्णयाविरोधात अनेक प्रदर्शनात तिने सहभाग घेतला होता. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे.