Ranveer Allahbadia: इंडियाज गॉट लेटेंट या कॉमेडी शोमध्ये वादग्रस्त विधान केल्यानंतर युट्यूबर रणवीर अलाहाबादिया अडचणींनी घेरला गेला आहे. त्याच्यावर देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत असून, आता अखिल भारत हिंदू महासभा रणवीरच्या विरोधात आक्रमक झाली आहे. महासभेच्या नेत्याने रणवीरची जीभ कापणाऱ्याला १ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांनी युट्यूबर रणवीर अलाहाबादियावर टीका केली.
रणवीर अलाहाबादिया हा सनातन विरोधी आहे, त्याने सनातन विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे, असे चतुर्वेदी म्हणाले आहेत.
काय म्हणाले शिशिर चतुर्वेदी?
"त्याने (रणवीर अलाहाबादिया) सनातन विरोधात अतिशय आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे जनक्षोभ निर्माण झाला आहे. त्याची घाणेरडी जीभ कापणाऱ्याला १ लाख रुपये बक्षीस देण्यात येईल", असे चतुर्वेदी म्हणाले.
महिला आयोगाची रणवीर अलाहाबादियाला नोटीस
राष्ट्रीय महिला आयोगाने रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या अपूर्वा मखीजा, जसप्रीत सिंह आणि आशीष चंचलानी यांच्यासोबतच शोचे निर्माते तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांना नोटीस बजावली आहे.
या सर्वांना १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत आयोगासमोर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबर क्राइम सेलनेही इलाहाबादिया आणि इतर ४० जणांना समन्स बजावले आहे.