नवी दिल्ली : ‘प्रसंगी कारागृहात जाण्याची माझी तयारी राहील. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) ठोठावलेला एक रुपयाचाही दंड देणार नाही,’ या शब्दांत आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी आव्हान दिले. दिल्लीमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर महोत्सव आयोजित केल्यामुळे पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल लवादाने ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मात्र, या वादाच्या पार्श्वभूमीवर ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्ट आॅफ लिव्हिंगने आज दंड भरला नसल्याने, तरी त्यांना उद्यापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. उद्याही दंड न भरल्यास काय कारवाई करायची, ते ठरवण्यात येईल, असे हरित लवादाने स्पष्ट केले. या महोत्सवाच्या ठिकाणी निदर्शने करण्याची तयारी काँग्रेसने चालवली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संगनमताने हा महोत्सव होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने हा महोत्सव रोखण्याबाबत आदेश देणारी कोणतीही याचिका दाखल करवून घेण्यास नकार दिला. भारतीय किसान मजदूर समितीने याचिका सादर केली असता सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर यांच्या खंडपीठाने त्यांना राष्ट्रीय हरित लवादाकडे जाण्यास सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
तुरुंगात जाईन, पण एक रुपयाही दंड देणार नाही
By admin | Published: March 11, 2016 4:25 AM