नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ६ महिन्यांनंतर मोदी घराबाहेर पडू शकणार नाहीत, या वक्तव्याचा समाचार घेतला. शिवाय काँग्रेसचे वादग्रस्त खासदार अधीर रंजन चौधरी यांनाही कोपरखळी हाणली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 31 जानेवारीला संयुक्त सत्रामध्ये अभिभाषण केले होते. यामध्ये 370 आणि 35 ए कलम हटविण्याचा उल्लेख केला होता. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखचा विकासाचा मार्ग खुला झाल्याचे ते म्हणाले होते.
यावर मोदी म्हणाले की, सरकार बदलली आहे. विचारही बदलण्याची गरज आहे. जर आम्ही पहिल्यासारख्याच मार्गाने चालत राहिलो तर पुढील 70 वर्षांपर्यंतही कदाचित 370 हटविले नसते. तसेच मुस्लिम महिलांवर तिहेरी तलाकची तलवार टांगती असली असती. राम जन्मभूमी आजही वादांमध्येच असली असती. करतारपूर साहेब कॉरिडॉरही कधीच बनला नसता आणि ना ही बांगलादेश सीमा वाद सुटला असता, असे मोदी यांनी सांगितले.
यानंतर मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली. कॅबिनेटमध्ये मंजूर झालेला प्रस्ताव पत्रकार परिषदेमध्ये फाडून टाकणाऱ्यांनाच संविधान वाचविण्याचे शिक्षण घेतले पाहिजे, असा टोला हाणला. यानंतर त्यांनी ६ महिन्यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.
काँग्रेसने गेल्या 70 वर्षांत कधीही आत्मसंतुष्टी अनुभवली नाही असे मला वाटते. काल एका काँग्रेसच्या नेत्याने सांगितले की देशातील तरुण मोदीला दांड्याने मारतील. मी पुढील सहा महिने अशा प्रकारे सूर्यनमस्काराची संख्या वाढवेन की पाठ मजबूत झाली पाहिजे. यामुळे कोणीही दांडा मारू शकेल. मी घाणेरड्या शिव्या ऐकल्या आहेत. आनंद यात आहे की 30-40 मिनिट बोलल्यानंतर काँग्रेसला आता तरी करंट लागला, असा टोला त्यांनी राहुल यांना हाणला. मोदींच्या भाषणावेळी विरोधासाठी उठलेल्या राहुल गांधी यांना यांच्यासारख्या ट्युबलाईटला आता करंट आला, अशी टिप्पणी केली.