Punjab Political Crisis : राजीनाम्यानंतर सिद्धूंची पहिली अन् थेट प्रतिक्रिया; व्हिडिओ जारी करत साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:58 AM2021-09-29T11:58:51+5:302021-09-29T11:59:23+5:30
पंजाबमध्ये मंगळवारी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर काँग्रेससमोर आता नवे संकट उभे राहिले आहे.
पंजाबमध्ये राजकीय गोंधळ सुरू असतानाच नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यात, आपण शेवटच्या श्वासापर्यंत हक्क आणि सत्याची लढाई लढत राहणार. तसेच नैतिकतेशी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे सिद्धूंनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर भ्रष्ट मंत्र्यांना पुन्हा आणण्याचा निर्णय आपण कधीही स्वीकारणार नाही, असेही सिद्धू यांनी म्हटले आहे. (I will keep fighting the fight for truth till my last breath says Navjot singh sidhu day after resignation as punjab congress chief)
सिद्धू म्हणाले, 17 वर्षांचा राजकीय प्रवास एका उद्देशाने केला. पंजाबमधील नागरिकांचे जीवन सुधारणे आणि एखाद्या मुद्द्यावरील राजकारनावर एक स्टँड घेऊन उभे राहणे, हाच माझा धर्म आहे आणि हेच माझे कर्तव्यही आहे. माझे काही वैयक्तिक भांडण नाही. मात्र, माझी लढाई मुद्द्यांची आहे. पंजाबच्या भल्यासाठी उभे राहणे हा माझा अजेंडा आहे आणि मी त्याच्याशी तडजोड करू शकत नाही आणि मी सत्यासाठी लढत राहणार.
हक़-सच की लड़ाई आखिरी दम तक लड़ता रहूंगा … pic.twitter.com/LWnBF8JQxu
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) September 29, 2021
...म्हणून सिद्धू नाराज -
पंजाबमध्ये मंगळवारी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर काँग्रेससमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमधील त्यांच्या जवळच्याच एका मंत्र्याने मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या मंत्रिमंडळातूनही राजीनामा दिला आहे. मानले जाते की, पंजाबमधील नव्या मंत्रिमंडळात आपल्या लोकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आणि उच्च पदांवर आपल्या लोकांची पोस्टिंग न केल्याने सिद्धू नाराज आहेत आणि यामुळेच त्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे पंजाबचे राजकारण ढवळून निघत आहे.