नवी दिल्ली - देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर सडकून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे. अर्थव्यवस्थेचं वस्त्रहरण होत असताना मी शांत बसणार नाही असं सांगत यशवंत सिन्हा यांनी आपला बंड अद्याप कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. एबीपीला दिलेल्या मुलाखतीत यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि अरुण जेटलींला खडे बोल सुनावले.
2019 मध्ये जेव्हा आम्ही निवडणुकाला उभे राहू तेव्हा लोक आम्हाला तुम्ही केलेल्या आश्वासनांचं काय झालं असं विचारणार आहेत असं यशवंत सिन्हा बोलले आहेत. 2019 मध्ये जेव्हा आम्ही निवडणुकाला उभे राहू तेव्हा आम्ही युपीएने काय केलं होतं हे सांगत बसू शकत नाही. आम्हाला आम्ही गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचं काय झालं याचं उत्तर द्यावं लागेल असं यशवंत सिन्हा यांनी यावेळी सांगितलं.
80 -85 लाख लोकांना रोजगार मिळाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. मात्र यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे असंही यशवंत सिन्हा बोलले आहेत. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काय सल्ला द्याल असं विचारला असता मी कोणताही सल्ला देणार नाही. मी तेवढा सक्षम नाही, माझ्यापेक्षा मोठे लोक सरकारमध्ये आहेत असा टोला यशवंत सिन्हा यांनी लगावला. मी जे केलं त्याचा अभ्यास केला तरी भाजपाला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील असंही यशवंत सिन्हा बोलले आहेत.
खूप सा-या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावी लागणार आहेत, खासकरुन अर्थव्यवस्थेबद्दल असं यशवंत सिन्हा यांनी भाजपाला सांगितले. भारतीय अर्थव्यवस्था अशाप्रकारे सुरु राहिली तर गरिबी हटवण्यासाठी अजून 21 वर्ष लागतील असंही यशवंत सिन्हा बोलले आहेत. रोजगार निर्माण करण्यात केंद्र सरकार अयशस्वी ठरला असून अनेक क्षेत्रात रोजगार कमी झाले आहेत. लोकांना अजूनही नोक-या मिळालेल्या नाहीत अशी टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे.
मोदी लाट आहे की नाही ? याबद्दल विचारलं असता मोदी लाट आहे की नाही माहित नाही. 2019 च्या निवडणुकीसाठी अजून दीड वर्ष बाकी आहे. खूप तयारी करावी लागणार आहे. कदातित अडथळे येण्याची शक्यता आहे. लोक प्रश्न विचारणार आहेत, आणि त्याची उत्तरे द्यावी लागणार आहेत असं यशवंत सिन्हा बोलले आहेत.