नवी दिल्ली: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर सरकारी यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. 'भाजपमध्ये आल्यावर सर्व गुन्हे माफ होतात, पण मी कधीच जाणार नाही, मी त्यांच्यासमोर कधीच झुकणार नाही. भाजपमध्ये येण्यासाठी दबाव आणला जात आहे,' असा दावा केजरीवालांनी केली.
किरारी विधानसभा मतदारसंघात दोन नवीन सरकारी शाळांच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, 'तुम्ही रोज वर्तमानपत्रात हे वाचत असाल, आजकाल हे लोक आमच्या खूप मागे लागले आहेत. त्यांनी मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकले आहे. ते म्हणतात की, सिसोदियांनी भ्रष्टाचार केला. सिसोदिया सकाळी सहा वाजता शाळांमध्ये पाहणी करायचे. कोणता भ्रष्ट व्यक्ती शाळांमध्ये पाहणी करतो? भ्रष्ट माणूस रात्री दारू पितो, फ्लर्ट करतो, चुकीची कामे करतो. आज तेच सगळे आमच्या मागे लागले आहेत.'
सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. त्यांनी पुन्हा एकदा मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना खोट्या खटल्यांमध्ये तुरुंगात टाकल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, 'सर्व एजन्सी केजरीवालांच्या मागे पडल्या आहेत. मनीष सिसोदिया यांची चूक आहे की ते चांगल्या शाळा बांधत होते. सत्येंद्र जैन यांची चूक आहे की ते चांगले रुग्णालय आणि मोहल्ला दवाखाने बांधत होते. आज मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी चांगली कामे केली नसती, तर त्यांना अटक झाली नसती,' असा घणातही त्यांनी यावेळी केला.
केजरीवाल पुढे म्हणतात की, 'त्यांनी सर्व कारस्थान रचली, पण आम्हाला झुकवू शकले नाही. तुम्हाला वाटत असेल की, आम्ही यापुढे शाळा आणि रुग्णालये बांधणे बंद करू, तर तसे होणार नाही. तुम्ही मला तुरुंगात टाकले तरी, शाळा आणि रुग्णालये बांधली जातील. जे गरीब मुले शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांच्या पालकांचे आशीर्वाद आमच्यावर आहेत.'