काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दाेन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठाेठावली. आता याच मुद्द्यावरून सध्या भाजपमध्ये असलेल्या व पूर्वी काॅंग्रेसमध्ये असलेल्या अभिनेत्री खुशबू सुंदर या ट्राेल झाल्या. त्यावर त्यांनी सडेताेड उत्तर दिले. याप्रकरणाचा खुशबू यांच्याशी काय संबंध असा प्रश्न पडला असेल तर काॅंग्रेसमध्ये असताना त्यांनी अशाच प्रकारची टीका करणारे ट्वीट केले हाेते. आता साेशल मीडियावर ते ट्वीट व्हायरल झाले आहे.
खुशबू यांनी त्या ट्वीटमध्ये म्हटले हाेते की, ‘इथे माेदी, तिथे माेदी.. मात्र, प्रत्येक माेदीच्या समाेर भ्रष्टाचार हे आडणाव लागले आहे. माेदी म्हणजे भष्टाचार.’ यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. ते ट्वीट हटविण्याचीही मागणी अनेकांनी केली. त्यांच्यावरही खटला चालविणार का असा, प्रश्नही अनेकांनी केला. मात्र, खुशबू यांनी त्यांना जाेरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्वीट केले की, त्यावेळी मी काॅंग्रेसमध्ये हाेते. त्यावेळी मी नेते राहुल गांधी यांची भाषा बाेलत हाेते. ते ट्वीट मी कदापि डिलिट करणार नाही. तुम्ही तुमच्या वेळेचा वापर करा. काॅंग्रेसला सध्या काेणतेही काम नाही. काॅंग्रेसच्या नेत्यांनी माझ्याबद्दल टीका करताना थाेडा तरी गृहपाठ करावा, असे खुशबू यांनी म्हटले आहे. खुशबू यांनी २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला हाेता.