बंगळुरू/ मुंबई - कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह तीन जणांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांनी रविवारी बंगळुरू येथे झालेल्या काँग्रेस विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीत काँग्रेसचा कर्नाटकमधील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, यावर मंथन झालं. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडूनच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित केलं जाणार आहे. तत्पूर्वी, आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे, त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
बंगळुरूतील एका खासगी हॉटेलात काँग्रेसच्या झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षप्रमुखांना नेता निवडीचे अधिकार देणारा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी, केंद्रीय निरीक्षकांनी एआयसीसीचे सरचिटणीस (संघटन) के सी वेणुगोपाल यांच्यासमवेत सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांची बैठक घेतली. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे निरीक्षक कर्नाटकातील आमदारांचे मत पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवतील व त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले होते.
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला स्पष्ट बहुमत आल्यानंतर आता तिथे मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा देशभर रंगली आहे. त्यातच, प्रदेशाध्यक्ष डीके. शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांची नावे प्राधान्याने पुढे आहेत. मात्र, या दोनपैकी एका नावावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. त्यातच, आज डीके शिवकुमार यांचा वाढदिवस असल्याने त्यांना दिल्लीतून बर्थ डे गिफ्ट मिळणार का, अशीही चर्चा होत आहे. त्यावर बोलताना, आज वाढदिवस असल्याने कार्यकर्ते मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येत आहेत. म्हणून मी आज इथेच आहे. मी दिल्लीत जाणार नाही, तर आज मंदिरात जाऊन पूजा-आरती करणार आहे, असे डीके शिवकुमार यांनी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री निवडीचा संपूर्ण अधिकार पक्षश्रेष्ठीकडे देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने नेमली तीन जणांची समिती
दरम्यान, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डि.के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची नावे चर्चेत आहे. पक्षाचा नवा विधिमंडळ नेता ठरवण्यासाठी काँग्रेस हायकमांडने सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जितेंद्र सिंग, दीपक बाबारिया यांची समिती नेमली आहे.