नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून भाजप खासदार वरुण गांधी शेतकरी कायद्यावरुन आपल्या सरकारवर टीका करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत आपल्या मतदारसंघातील पीक खरेदीत कोणत्याही प्रकारची अनियमितता ठेवणार नसल्याचे म्हटले आहे.
नवीन कृषी कायदे आणि यूपी सरकारवर सातत्याने केलेल्या टीकेमुळे वरुन गांधी यांना पक्षाच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. आता वरुण यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, जर शेतकर्यांच्या मुद्द्यांमध्ये भ्रष्टाचार झाला तर सरकारसोबत हातमिळवणी करणार नाही, थेट कोर्टात जाणार. हा व्हिडिओ शेअर करताना वरुण गांधी यांनी लिहिले की, “जोपर्यंत एमएसपीची वैधानिक हमी मिळत नाही तोपर्यंत अशा मंडईंमध्ये शेतकऱ्यांचे शोषण होतच राहील. यावर कठोर कारवाई व्हायला हवी."
कर्मचाऱ्यांना इशारा
याच व्हिडिओमध्ये वरुण गांधी एका मार्केटमध्ये कर्मचाऱ्यांना अटक करण्याचा इशारा देताना दिसत आहेत. मध्यस्थांचा उल्लेख करून ते म्हणाले, ''आम्ही प्रत्येक गोष्टीत निमित्त शोधता. ओलावा, तुटणे, काळेपणा असे सबब सांगून तुम्ही पिके नाकारता. तुम्ही हेच पीक तुमच्या मित्रांना आणि इतर मध्यस्थांना 11-1200 ला विकता आणि इतरांना 1940 मध्ये विकता. आतापासून माझा एक प्रतिनिधी राहील आणि प्रत्येक प्रमुख खरेदी केंद्रावर लक्ष ठेवेल. तुम्ही लोकांनी भ्रष्टाचार केला किंवा शेतकर्यांवर अन्याय केला तर मी सरकारसमोर हातपाय जोडणार नाही, मी थेट कोर्टात जाऊन तुम्हा सर्वांना अटक करेन,''असा इशाराच वरुण गांधींनी दिला.
याआधीही वरुण गांधी यांनी लखीमपूर जिल्ह्यातील बाजारपेठेत शेतकऱ्यांचे पीक जाळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला होता. शनिवारी वरुण गांधी यांनी एका शेतकऱ्याचा व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले, "उत्तर प्रदेशातील समोध सिंह, शेतकरी गेल्या 15 दिवसांपासून आपले पीक विकण्यासाठी मंडईत चकरा मारत होते, हे विकले गेले नाही तेव्हा निराश होऊन आपल्याच पीकाला आग लावली. या व्यवस्थेने शेतकऱ्यांना कुठे आणले आहे? कृषी धोरणाचा पुनर्विचार करणे ही काळाची गरज आहे. यापूर्वी अनेकदा वरुण गांधी यांनी कृषी कायद्यांबाबत भाष्य केलं आहे.