मी अपमान सहन करणार नाही; कॅप्टन अमरिंदर सिंग घेणार 'आर या पार'ची भूमिका, हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 02:35 PM2021-09-18T14:35:09+5:302021-09-18T14:36:11+5:30
पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चांगलाच भडकण्याची शक्यता आहे.
चंदीगड: पंजाबकाँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चांगलाच भडकण्याची शक्यता आहे. 'आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही' असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिला आहे. आज होणाऱ्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची खदखद बाहेर पडली असून त्यांनी आता 'आर या पार' अशी भूमिका घेतली आहे.
राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अशा प्रकारचा अपमान खूप झाला आहे. असा अपमान सहन करत मी पक्षात राहू शकत नाही, असं मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबमध्ये आज होणारी आमदारांची बैठक ही मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासाठी अडचणीची ठरु शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला सर्व आमदारांनी हजर राहणं बंधनकारक आहे असा आदेश पक्षाकडून देण्यात आला आहे.
जवळपास 40 हून अधिक नाराज आमदारांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पदावरुन हटवावं अशी भूमिका घेत हायकमांडला पत्र लिहिलं आहे. त्यामुळे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पंजाबच्या नेतृत्वात बदल करणार असल्याची चर्चा सुरु आहे. पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्यातील आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद आता भडकण्याची शक्यता आहे.
अमरिंदर सिंगही सक्रीय-
आमदारांची बैठक होणार असल्याचं कळताच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही आमदारांची बैठक बोलावली आहे. आमदारांच्या बैठकीत काँग्रेस हायकमांडकडून 18 सूत्री फॉर्म्युला मांडला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सिद्धू समर्थकांची भाषा आणि एकूणच बॉडी लँग्वेज पाहता अमरिंदर सिंग यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये दोन गट-
2022 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पंजाबात राजकीय वातावरण गरम आहे. त्यात पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी माजल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग विरूद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे थेट दोन गट पडले आहेत. सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षातच आव्हान दिलं आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून सिद्धू यांची वर्णी लावून काँग्रेस हायकमांडनेही सिद्धूच्या पारड्यात वजन टाकलं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नवज्योत सिद्धू हे काँग्रेसचा चेहरा असतील असं बोललं जात आहे.