नवी दिल्ली - काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांचे नाव गेल्या आठ वर्षांपासून पुढे केले जात आहे. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागल्याने राहुल गांधींना पंतप्रधानपदी बसवणे काँग्रेसला शक्य होऊ शकलेले नाही. दरम्यान, राहुल गांधींचा असा एक समर्थक आहे, ज्याने जोपर्यंत राहुल गांधी हे पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा केली आहे. गेल्या ११ वर्षांपासून तो या प्रतिज्ञेचे पालन करत तो गेल्या ११ वर्षांपासून अनवानी वावरत आहे.
राहुल गांधींच्या या सुपरफॅनचं नाव दिनेश शर्मा असे आहे. दिनेश शर्मा याला पाहून मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरचा चाहता असलेल्या सुधीरचा आठवण येते. सुधीर ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरा समर्थन देत जगाच्या कानाकोपऱ्यात जात असे, त्याप्रमाणेच दिनेश शर्माही राहुल गांधींच्या दौऱ्यामध्ये त्यांना समर्थन देण्यासाठी उपस्थित असतो.
दिनेश याने सांगितले की, मी मुळचा हरियाणातील जिंद येथील रहिवासी आहे. माझे कुटुंब काँग्रेसी विचारांचे आहे. त्यामुळे लहानपणापासून काँग्रेसबाबत ऐकतच मी मोठा झालो. जेव्हा मतदानाचा हक्क मिळाला तेव्हापासून माझा कल हा राहुल गांधींकडेच होता. त्यानंतर मी २०११ मध्ये जोपर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अनवानी राहीन, अशी प्रतिज्ञा केली.
दिनेशने पुढे सांगितले की, मी राहुल गांधींसोबत भारतभर फिरलो आहे. जिथे त्यांची सभा असते तिथे मी जातो. आता पाच राज्यांमध्ये निवडणूक आहे. राहुल गांधी पंजापमध्ये प्रचार सुरू करत आहेत. त्यामुळे मीसुद्धा येथे पोहचलो आहे.