मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तांतर होईल आणि पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. निवडणूक निकालाच्या आधारावर सर्व पक्ष एकत्र येऊन एक किमान समान कार्यक्रम तयार करतील आणि नवं सरकार स्थापन होईल, असंही पवार म्हणाले. ते आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या 'मुंबई मंथन' कार्यक्रमात बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, असा दावा शरद पवारांनी केला. 'देशातील जनतेला परिवर्तन हवं आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीनंतर देशात आघाडी सरकार स्थापन होऊ शकतं. मोदी त्यांच्या पक्षाचे सर्वात शक्तिशाली नेते आहेत. मात्र त्यांना देशाचे सामर्थ्यशाली नेते मानण्याची चूक करु नका,' असं शरद पवार म्हणाले. पुढील निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असं भाकितदेखील त्यांनी वर्तवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्यक्तीमत्त्व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखं नाही, याकडे पवारांनी लक्ष वेधलं. मोदी आणि वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्त्वात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्त्वाखाली आघाडी सरकार स्थापन होण्याचा प्रश्नच येत नाही, असं पवार म्हणाले. देशाचा पुढील पंतप्रधान ठरवण्यात आपली भूमिका महत्त्वाची असेल, असं सूचक विधान त्यांनी केलं. केवळ सत्तेसाठी सर्व विरोधक एकत्र येतात, या मोदींच्या टीकेलादेखील पवारांनी उत्तर दिलं. 2014 मध्ये मिळवलेला एकतर्फी विजय सोडल्यास त्याआधी भाजपानंदेखील कायम आघाडीच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण पवारांनी करुन दिली.
पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 12:25 PM