गेल्या काही दिवसापासून टीएमसीचे नेते अडचणीत सापडले आहेत. काही नेत्यांची ईडी चौकशी सुरू आहेत. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आज तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला.' जर केंद्रीय एजन्सींनी त्यांच्या पक्षाच्या चार नेत्यांना अटक केली, तर राज्य पोलीस भाजपच्या आठ नेत्यांना अटक करतील आणि तुम्हाला तुरुंगात पाठवतील, अशा इशारा मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी भाजपला दिला आहे. कोलकाता येथे एका सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "त्यांनी आमच्या चार आमदारांना तुरुंगात पाठवले, या विचाराने आमची संख्या कमी होईल. जर त्यांनी माझ्या चार लोकांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले, तर मी त्यांच्या आठ नेत्यांना काही प्रकरणांमध्ये तुरुंगात पाठवीन, असा इशारा त्यांनी दिला.
अभिनेता प्रकाश राज यांच्या अडचणी वाढल्या! ईडीचे समन्स पाठवले, पोंझी स्कीमप्रकरणी होणार चौकशी
कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केले. या बैठकीला शेकडो टीएमसी खासदार, आमदार आणि ब्लॉक आणि गाव पातळीवरील नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, केंद्राने सर्वांना बंदुकीच्या टोकावर ठेवले आहे. “आज तुम्ही हसत आहात कारण आमच्या पक्षाचे नेते अनुब्रता मंडल, पार्थ चॅटर्जी, माणिक भट्टाचार्य, ज्योती प्रिया मल्लिक आणि इतर काही नेते तुरुंगात आहेत. ही परंपरा कायम राहणार, तुम्ही खुर्चीवर नसताना भविष्यात कुठे असणार? एका कपाटात?", असा टोलाही बॅनर्जी यांनी लगावला. ईडीने विविध कथित घोटाळ्यांमध्ये अटक केल्यानंतर किमान पाच उच्च-प्रोफाइल TMC नेते आता न्यायालयीन कोठडीत आहेत. यामध्ये चार आमदारांचाही समावेश असून त्यापैकी दोन राज्यमंत्री राहिले आहेत.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "तुम्हाला वाटते की तुम्ही काहीही कराल कारण तुम्ही केंद्रात सत्तेत आहात. तुम्ही टीएमसी, अरविंद केजरीवाल, अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि इतर नेत्यांवर ईडी आणि सीबीआय खटले दाखल करत आहात. येत्या काळात हेच अधिकारी तुमच्या मागे लागतील आणि तुम्हाला कोणी सुरक्षा देणार नाही.
"तुम्ही परदेशात जाऊन अनेक विमाने खरेदी केली. एक दिवस प्रश्न उपस्थित होतील. एक दिवस तुम्ही बोफोर्सबाबत राजीव गांधींवर प्रश्न उपस्थित केलेत. मी ती निवडणूक लढवली होती. बोफोर्सची खिल्ली उडवली गेली, चोराप्रमाणे घोषणाबाजी करण्यात आली. आता तुमचा सौदा काय होता? पैसे कुठे गेले?", असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला.
भाजपने केला पटलवार
सीएम ममता बॅनर्जी यांच्या विधानावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "टीएमसी सुप्रिमो विरोधकांना धमकावू लागले आहेत. भाजप नेते राहुल सिन्हा म्हणाले, "त्यांना माहित आहे की त्या आपली जागा गमावत आहे. आगामी काळात त्यांच्या पक्षाचे आणखी नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जातील. या अटकेशी भाजप किंवा केंद्राचा काहीही संबंध नाही. हे सर्व कोर्टाने आदेश दिलेले तपास आहेत. त्यांच्या पोलिसांनीही भाजप नेत्यांवर खटले तपासण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरले."