नुकत्यात झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळळून प्रियंका गांधी यांनी संसदीय राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर आता प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही सक्रीय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. एक जुना व्हिडीओ शेअर करून वाड्रा यांनी तसे संकेत दिले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओला रॉबर्ट वाड्रा यांनी मीसुद्धा लवकरच जॉईन करेन, अशी कॅप्शन दिली आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशाची चर्चा याआधीही रंगली होती. तसेच त्यांनी अमेठी येथून निवडणूक लढवण्यासाठी दावा ठोकला होता. मात्र तेव्हा काँग्रेसने रॉबर्ट वाड्रा यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे सक्रिय राजकारणात उतरण्यासाठी इच्छूक असलेल्या रॉबर्ट वाड्रा यांचा नवा दावा कितपत खरा ठरेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
प्रियंका गांधी यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली तेव्हाही रॉबर्ट वाड्रा यांनी सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. ते म्हणाले होते की, प्रियंका गांधी खासदार बनल्याने माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. मीसुद्धा सक्रिय राजकारणात येण्यास सज्ज आहे. काँग्रेसला जेव्हा वाटेल तेव्हा मी सक्रिय राजकारणात येईन. भाजपा ज्या गोष्टींबाबत लपवाछवपी करतेय, त्या प्रियंका गांधी संसदेत उपस्थित करतील. यंत्रणांचा दुरुपयोग आणि महिलांसाठीचे प्रश्न प्रियंका गांधी मांडतील.
दरम्यान, काँग्रेस पक्षावर असलेली नेहरू-गांधी कुटुंबीयांची पकड आणि एकाच कुटुंबातील अनेक सदस्य संसदेत असल्यावरून भाजपा काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करत असतो. त्यात आता रॉबर्ट वाड्रा हे सक्रिय राजकारणात उतरले तर भाजपाच्या हाती आयतं कोलीत मिळेल. तर दुसरीकडे राहुल गांधी नव्हे तर प्रियंका गांधी ह्या काँग्रेसच्या उत्तराधिकारी असतील, असा दावा अनेक राजकीय जाणकारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेसच्या राजकारणात रॉबर्ट वाड्रा यांचं महत्त्व वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.