बंगळुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यामुळे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज चांगलेच चर्चेत आले आहेत. नरेंद्र मोदींवर टिप्पणी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात एका वकिलाने या प्रकरणी लखनऊ कोर्टात तक्रार देखील केली आहे. प्रकाश राज यांनी खडेबोल सुनावल्यापासून त्यांना सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. पण त्याचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झालेला दिसत नाही. मी मोदीविरोधी नाहीये. पण जेव्हा गरज असेल तेव्हा मी सत्य बोलणारच, तो माझा हक्क आहे असं रोखठोक वक्तव्य त्यांनी ते द हिंदूला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये केलं आहे. चुकीच्या गोष्टींबाबत बोलल्यास मला मोदीविरोधी म्हणण्याची हिम्मत कशी होऊ शकते असा सवालही त्यांनी विचारला आहे.
'ज्या लोकांनी गौरी लंकेश यांची हत्या केली ते अद्याप पकडले गेले नाही. त्यांना पकडणे, शिक्षा करणे हा वेगळा मुद्दा आहे, मात्र देशात हजारो लोक असे आहे, जे सोशल मीडियावर आनंदोत्सव साजरा करत आहे. आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहित आहे हे कोण लोकं आहेत आणि ते कोणत्या विचारधारेचे आहेत. मृत्यूवर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांपैकी काही असेही आहेत ज्यांना आमचे पंतप्रधान मोदी फॉलो करतात. मला याच गोष्टीची चिंता आहे, आपला देश कोणत्या दिशेने चालला आहे?' पंतप्रधान त्यांच्या फॉलोअर्सच्या प्रतिक्रियांवर मौन बाळगून आहेत. त्यांची चुप्पी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? ते काय माझ्यापेक्षाही मोठे कलाकार होण्याचा प्रयत्न करत आहेत? त्यांचे मौन मला त्रस्त करत आहे. त्यांनी साधलेले मौन हे त्यांच्या फॉलोअर्सना मुक समर्थनाचा प्रयत्न आहे का?'असं प्रकाश राज म्हणाले होते.
देशाचा जबाबदार नागरीक म्हणून पंतप्रधानांच्या मौनामुळे मला दुःख झालं आणि त्याचं मौन मला त्रस्त करत आहे असं मी म्हणालो... यासाठी मला मोदीविरोधी बोलण्याची हिम्मत कशी होते... मी मोदीविरोधी नाहीये... ते बहुमताद्वारे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत... काही मुद्यांवर माझे त्यांच्याशी मतभेद आहेत.... मी प्रामाणिकपणाची किंमत चुकवतोय....ट्रोल करणा-यांमुळे मला काही फरक पडणार नाही.... परिणाम काहीही झाले तरी चालेल पण जेव्हा गरज असेल तेव्हा मी सत्य बोलणारच असं प्रकाश राज म्हणाले आहेत.
(फोटो सौजन्य - The Hindu)