ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. १९ - भाजपचे माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धूच्या राजीनाम्याच्या मुद्यावर त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धूने मंगळवारी मौन सोडले. सिद्धू यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पण मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकलेले नाही. मी भाजपमध्येच रहाणार आहे असे नवज्योत कौर सिद्धूने स्पष्ट केले.
नवज्योत कौर सिद्धू पंजाब विधानसभेमध्ये भाजपच्या आमदार आहेत. संसदीय सचिव असल्याने त्यांना पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्र्यासारखा दर्जा आहे. मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करत आहे असे नवज्योत कौर सिद्धू यांनी सांगितले.
सिद्धू यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, माझ्या पतीला पंजाबची सेवा करायची आहे. सिद्धू यांचा शिरोमणी अकाली दलाला पाठिंबा नव्हता. त्यांचे वेगळे विचार होते. पक्षाने शिरोमणी अकाली दलाबरोबर विधानसभा निवडणूक लढवायाचा निर्णय घेतला. याचा अर्थ पक्ष त्यांच्या मताचा आदर करत नाही हे स्पष्ट होते असे नवज्योत कौर सिद्धू यांनी सांगितले.
लवकरच पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार असून, २००७ पासून पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजपचे सरकार आहे. भाजपला रामराम करणारे सिद्धू पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे.