पाटणा - सरकारी नोकरी करताना अनेकदा वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागते. त्यावेळी, समजुतीतून वरिष्ठांनी सांगितलेली व्यक्तीगत कामेही केली जातात. मात्र, काही नोकरदार स्पष्टपणे व्यक्तीगत कामांना नकार देऊन आपला परखडपणा दाखवून देतात. नुकताच सोशल मीडियावर बिहारमधीलमहिलापोलिसाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, महिला पोलीस कॉन्स्टेबलने पाणी देण्यावरुन थेट न्यायाधीशांसोबतच पंगा घेतल्याचं दिसून आलं.
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओत, ''मी सरकारची नोकर आहे, तुमची नाही. मग, तुमचे काम का करू?,'' असा थेट सवाल महिला पोलिसाने न्यायाधीश महोदयांना केल्याचं दिसून येत आहे. न्यायाधीशांनी महिला कॉन्स्टेबल पाणी आणण्यासाठी सांगितले. त्यावर, महिलेने नकार दिला. त्यामुळे, न्यायाधीशांना कारवाई करण्याची धमकी दिली होती. त्यावरुन, न्यायाधीश व महिला पोलीस कॉन्स्टेबल यांच्यात वाद सुरू झाला.
दरम्यान, महिला कॉन्स्टेबलला एका कार्यक्रमात ड्युटी लावण्यात आली होती. तेथे उपस्थित असलेल्या न्यायाधीश महोदयांनी नाश्ता केला, त्यानंतर तेथील महिला कॉन्स्टेबलला एक बॉटल पिण्याचे पाणी आणण्याची सूचना केली. पाणी आणण्यास सांगितल्याने महिला कॉन्स्टेबलला राग अनावर झाला. आम्ही सरकारचे नोकर आहोत, सरकारचे काम करणार. कुणाचे खासगी नोकर नाहीत, त्यांचं काम करायला, असं प्रत्युत्तर महिला पोलिसाने दिले. विशेष म्हणजे न्यायाधीश महोदयांनी स्वत: नाश्ता केला. पण, ड्युटीवरील पोलिसांना नाश्त्यासंदर्भात विचारलं नाही. त्यामुळेही, पोलीस संतापले होते. दरम्यान, तेथील इतर पोलीस कर्मचाऱ्यांनीही महिला कॉन्स्टेबलचे समर्थन केले आहे.
व्हायरल व्हिडिओनंतर न्यायाधीशांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार, येथे ४ दिवसांपासून ड्युटी सुरू आहे, पण पाण्याची व्यवस्था नाही. मी घरातूनच ४ बॉटल पाणी घेऊन येत होतो. स्वत: पिल्यानंतर या कर्मचाऱ्यांनाही देत होतो, असे न्यायाधीशांनी म्हटले. तसेच, महिला कॉन्स्टेबलची तक्रार डीएसपींकडे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.