RPN Singh, UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकांचा माहोल आहे. उत्तर प्रदेशात भाजपा आणि सपा या दोन राजकीय पक्षांमध्ये महत्त्वाची लढत पाहायला मिळणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. काँग्रेसदेखील उत्तर प्रदेशात आपला जोर लावत आहे. प्रियांका गांधी स्वत: या निवडणुकीत उत्तर प्रदेशकडे लक्ष ठेवून आहेत. पण अशा परिस्थितीत सोमवारी काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. आरपीएन सिंह यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. त्यानंतर त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचं नक्की कारण काय? असा प्रश्न त्यांनी भाजप प्रवेशानंतर पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "मी गेली ३२ वर्षे एकाच पक्षात म्हणजेच काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. पण सध्याची काँग्रेस आणि माझ्या वेळची काँग्रेस यात फरक आहे. आताचा काँग्रेस पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्यामुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपामध्ये मी सामान्य कार्यकर्त्यासारखाच असेन. पंतप्रधान मोदी यांचे भारताच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल."
आरपीएन सिंह हे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या तिकिटावर पडरौना येथून स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात निवडणूक लढवू शकतात. याच मुद्द्यावर पत्रकारांनी सवाल केला की तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेही यंदाची उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार आहात अशी चर्चा आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? त्यावर सिंह म्हणाले की सध्या तरी मी एवढं नक्कीच सांगेन की मी एकटाच राजकारणात आहे. मला माझा पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी पार पाडेन.
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच आरपीएन सिंह हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा होती. ते यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री होते. तसेच उत्तर प्रदेशातील पूर्वांचल पट्ट्यातील पडरौना येथे वास्तव्यास असल्याने त्यांना काँग्रेसने स्टार प्रचारकही बनवलं होतं. पण त्यांनी आज अचानक काँग्रेसमधून राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला.