भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. जोपर्यंत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस पक्ष खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या विधानाचा निषेध करत नाहीत, तोपर्यंत राहुल गांधी यांना एकदा नाही तर १०० वेळा दहशतवादी म्हणेन, असा इशारा बिट्टू यांनी दिला.
न्यूज १८ च्या एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसवर टीका करताना रवनीत सिंग बिट्टू म्हणाले की, राहुल गांधी पन्नू आणि पाकिस्तान हा संपूर्ण त्रिकोण तुमच्या समोर आला आहे. नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस हेच सांगत आहेत की, कलम ३७० पुन्हा लागू केलं जाईल. तर दुसरीकडे शिखांना खिळखिळे करण्यासाठी पगडी आणि कड्याबाबत बोलत आहेत. त्याच गोष्टी पन्नू बोलत आहे आणि तेच पाकिस्तान बोलत आहे.
यावेळी राहुल गांधी यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्याबद्दल दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत विचारलं असता रवनीत सिंग बिट्टू म्हणाले की, मी राहुल गांधी यांच्याबाबत अजिबात मवाळ भूमिका घेतलेली नाही. माझं जे विधान होतं, ते इतर अनेक लोकांसोबत जोडलं गेलं. राहुल गांधींबाबत आज नड्डा यांनी खूप भक्कमपणे अगदी योग्य पद्धतीने काँग्रेसच्या अध्यक्षांना उत्तर दिलं आहे, असेही रवनीत सिंग बिट्टू म्हणाले.
रवनीत सिंग बिट्टू पुढे म्हणाले की, आम्ही हुतात्म्याच्या कुटुंबातील आहोत. त्यांनी बलिदान दिलेलं आहे. आम्हाला बलिदान द्यावं लागलं, कारण गांधी कुटुंबीयांनी येथे आग लावली होती. तीच आग जम्मू-काश्मीरमध्ये लावली. यांचा बचाव करण्यासाठी पन्नू आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री उभे राहिले. जे वक्तव्य पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी केलं आहे, तसेच जे काही पन्नू बोलला आहे, त्याला पाठिंबा देतात की विरोध करतात, हे मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट करावं, असे आव्हानही बिट्टू यांनी दिलं.