"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 10:07 PM2024-05-23T22:07:04+5:302024-05-23T22:08:32+5:30
PM Modi Patiala Rally Speech: "काँग्रेसने सत्तेसाठी देशाचे विभाजन केले. फाळणीही अशा प्रकारे केली की, करतारपूर साहिब पाकिस्तानात गेले."
PM Modi Patiala Rally : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे प्रचाराचा जोरही तेवढाच वाढला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये आयोजित एका जाहीर सभेतून काँग्रेसवर जोरदार हल्लाबो केला. "बांगलादेशविरोधात युद्ध झाले, तेव्हा 90 हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक आपल्या ताब्यात होते. त्यावेळी मी असतो, तर करतारपूर साहिब भारताला दिल्याशिवाय पाकिस्तानी सैनिकांना सोडले नसते," असे मोदी यावेळी म्हणाले.
पटियाला येथे आयोजित जाहीर सभेत मोदी म्हणतात, "आमच्या सरकारने अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुखरुप परत आणले. काँग्रेसने सत्तेसाठी देशाचे विभाजन केले. फाळणीही अशा प्रकारे केली की, करतारपूर साहिब पाकिस्तानात गेले. 1971 च्या युद्धानंतर पाकिस्तानचे 90 हजारांहून अधिक सैनिक भारताच्या ताब्यात होते. त्यावेळच्या सरकारला हवे असते तर करतारपूर साहिब परत घेता आले असते, पण तसे झाले नाही. त्यावेळी मी असतो, तर आधी करतारपूर साहिब परत घेतले असते. 10 वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या आमच्या सरकारमुळे करतारपूर कॉरिडॉरचा मार्ग मोकळा झाला. त्यापूर्वी दूरवरुनच दर्शन करावे लागत होते."
Exuberant atmosphere at the rally in Patiala! There is great support for the NDA across Punjab. https://t.co/7FHLEkOwaB
— Narendra Modi (@narendramodi) May 23, 2024
गांधी कुटुंबावर निशाणा साधत मोदी पुढे म्हणाले, "1962 च्या युद्धात चीनच्या हातून भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. ज्यांच्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं, ते लोक आता या पराभवासाठी लष्कराला जबाबदार धरतात. काँग्रेसला देश प्रिय नसून त्याची सत्ता प्रिय आहे आणि त्यासाठी ते काहीही करू शकतात." शेतकरी प्रश्नावर बोलताना पीएम मोदी म्हणतात, "इंडी आघाडीने शेतकऱ्यांना आश्वासने दिली, पण ती पूर्ण करण्याची तसदी घेतली नाही. आम्ही एमएसपीमध्ये अडीच पट वाढ केली. आमचे सरकार नैसर्गिक शेतीवर भर देत आहे. जे अण्णा हजारेंचा विश्वासघात करू शकतात, ते ना पंजाबची काळजी घेऊ शकतात आणि ना तुमच्या मुलांना काही देऊ शकतात" अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.