ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 2 - जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्यांनं केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले. यानंतर पाकिस्तानी सैन्यानं शहीद जवानांचे शीर कापून त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याला चोख उत्तर देण्याचा इशारा भारताने दिला आहे. लष्कराला त्यासाठी सर्वाधिकार देण्यात आल्याचे वृत्त आहे.
तर शहीद जवान प्रेम सागर यांच्या मुलीने तिच्या वडिलांच्या बलिदानाच्या बदल्यात 50 पाकिस्तानी सैनिकांचे शीर हवे असल्याचे सांगत आपला आक्रोश व्यक्त केला आहे.
सोमवारी कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत 250 मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्तानी विशेष दलाच्या सैन्यानं केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात दोन भारतीय जवान शहीद झाले. या शहीद जवानांच्या मृतदेहाची पाकिस्तानकडून विटंबना करण्यात आली. या गोळीबारात बीएसएफचे जवान प्रेम सागर शहीद झालेत.
या घटनेविरोधात प्रेम सागर यांच्या कुटुंबीयांना आक्रोश व्यक्त केला आहे. या कृत्याचा निषेध व्यक्त करत त्यांच्या मुलीने वडिलांनी दिलेल्या बलिदानाच्या बदल्यात मला 50 पाकिस्तानी सैन्यांचे शीर हवे आहेत, अशी मागणी करत संताप व्यक्त केला आहे.
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात पंजाबमध्ये राहणारे नायब सुभेदार परमजीत सिंहदेखील शहीद झाले. त्यांच्याही मृतदेहाची पाकिस्ताननं विटंबना केली. दरम्यान, या अमानुष कृत्याला चोख उत्तर देण्याचा इशारा भारताने दिला आहे. लष्कराला त्यासाठी सर्वाधिकार देण्यात आल्याचेही वृत्त आहे.
दरम्यान, सोमवारी केलेल्या हल्ल्याविरोधात भारतानेही पाकिस्तानला जशास तसे चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने दोन पाकिस्तानच्या दोन चौक्यांवर हल्ला केला असून त्यात पाकच्या 7 सैनिकांना कंठस्नान घातल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे
दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. कमार जावेद बाजवा यांनी नियंत्रण रेषेजवळील काही भागाला भेट दिल्यानंतर विशेष दलाचा समावेश असलेल्या सीमा कृती दलाने (बीएटी) हा हल्ला केला. निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान पूंछ जिल्ह्याच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील बीएसएफच्या चौकीवर पाकिस्तानी चौकीवरील सैनिकांनी अग्निबाण आणि स्वयंचलित शस्त्रांनी तुफान गोळीबार केला. या हल्ल्यात लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंग आणि बीएसएफच्या २००व्या तुकडीचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर शहीद झाले. तर राजेंद्रसिंग नामक जवान जखमी झाला. पाकच्या जवानांनी नंतर भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली.
त्यामुळे शहीद जवानांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते. या हल्ल्यानंतर भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत हे सोमवारी काश्मीरमध्ये होते. त्यांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पुढील रणनीतीची चर्चा केल्याचे समजते. जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणे ही अमानुषता असून, भारतीय सशस्त्र दल या अमानुष कृत्याला चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिला. तर भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीत तोफगोळ्यांचा मारा करीत प्रत्युत्तर दिले. योग्यवेळी योग्य ठिकाणी या हल्ल्याचा सूड घेतला जाईल, असे नॉदर्न कमांडने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
महिन्यात सात घटना
पाकिस्तानी सैन्याने पूंछ आणि राजौरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर गेल्या महिनाभरात सात वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. 19 एप्रिलला पूंछमध्ये 17 एप्रिलला नौशेराच्या चौक्यांवर तोफांचा मारा केला होता. याशिवाय भीमभर गली सेक्टर, बालाकोटे आणि (दिगवार) पूंछमध्येही गोळीबार केला होता.
पाक जवान, दहशतवाद्यांकडून गोळीबार
पाकिस्तानने आधी रॉकेट आणि शस्त्रांनिशी हल्ला केला. बॅट आणि अतिरेक्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केल्यानंतर दोन शहीद जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली. अतिरेकी घुसखोरी करतात त्या वेळी बॅटकडून मोठा हल्ला केला जातो. पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांनी भेट दिलेल्या स्थळापासून ३० किमी अंतरावर ही घटना घडली.
गेल्या वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती...
गेल्या वर्षी २८ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैनिकांनी मनदीप सिंग या भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली होती. मच्छेल सेक्टरमध्ये अतिरेक्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यात मनदीप सिंग शहीद झाले होते.
जून २००८मध्ये गोरखा रायफल्सच्या एका जवानाला पकडण्यात आल्यानंतर त्याचे शीर कापून फेकण्यात आले होते. २०१३मध्ये लान्सनायक हेमराज आणि सुधाकर सिंग या दोन जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आली होती. कारगील युद्धाच्या वेळी कॅप्टन सौरभ कालिया यांचा मृतदेह विद्रूप केला होता.
Got no information from administration about his death; want 50 heads for his sacrifice: Saroj, daughter of BSF head constable Prem Sagar pic.twitter.com/eXmOTp5uFo— ANI UP (@ANINewsUP) May 2, 2017