नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी करारावरुन काँग्रेस सतत मोदी सरकारवर निशाणा साधत असताना आता हवाई दल प्रमुखांनी राफेलची गरज अधोरेखित केली आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं राफेलची कामगिरी महत्त्वाची असेल, असं हवाई दलाचे प्रमुख बिरेंदर सिंग धनोआ यांनी म्हटलं आहे. त्यांनी चीन आणि पाकिस्तानचा उल्लेख करत देशाला राफेलची गरज असल्याचं सांगितलं. आपली शेजारी राष्ट्र अण्वस्त्र संपन्न असून त्यांच्याकडून विमानांचं आधुनिकीकरण सुरू आहे, असं हवाई दल प्रमुखांनी म्हटलं. राफेलच्या मदतीनं आम्ही संकटांचा सामना करु शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच वाईस चीफ एअर मार्शल एस. बी. देव यांनीही राफेल डीलचं समर्थन केलं होतं. या करारावर टीका करणाऱ्यांनी आधी खरेदी प्रकिया समजून घ्यायला हवी, असं देव म्हणाले होते. राफेल आणि एस-400 विमानांच्या मदतीनं सरकारकडून हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं धनोआ म्हणाले.'भारतीय हवाई दलाला 42 स्क्वॉड्रन्सची गरज आहे. मात्र सध्या आमच्याकडे 31 स्क्वॉड्रन्स आहेत. आपल्या हवाई दलाकडे 42 स्क्वॉड्रन्स असल्या, तरी त्यांचं प्रमाण चीन आणि पाकिस्तानच्या एकत्रित स्क्वॉड्रन्सपेक्षा कमीच असेल,' असं धनोआ यांनी म्हटलं. गेल्या दशकभरात चीनने सीमावर्ती भागात रस्ते आणि रेल्वेचं जाळं उभारलं आहे. याशिवाय चीनचं सामर्थ्यदेखील वाढलं आहे, असं धनोआ यांनी सांगितलं.