हिंडन (गाझियाबाद) : भारतीय हवाई दलाचा आज 88वा स्थापना दिवस आहे. १९३२ मध्ये ८ ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती, त्यामुळे हा दिवस ‘हवाई दल दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर हवाई दलाची ताकद पाहायला मिळणार आहे. येथील आयोजित कार्यक्रमात यंदा एकूण 56 विमानांचा सहभाग आहे. यामध्ये राफेल, सुखोई, मिग29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांचा समावेश आहे. यावेळी हिंडन एअरबेसवर थरारक प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे राफेल लढाऊ विमान हे यंदाचे खास आकर्षण आहे.
दरम्यान, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यामातून हवाई दलाच्या जवानांचे अभिनंदन केले आहे. "हवाई दलाच्या दिनानिमित्त भारतीय हवाई दलाच्या सर्व शूर योद्ध्यांना शुभेच्छा! आपण फक्त देशाचे अवकाश सुरक्षित ठेवत नाही तर आपत्तीच्यावेळी मानवतेच्या सेवेतही अग्रेसर भूमिका बजावत असता. भारत मातेच्या रक्षणासाठी आपले धैर्य, पराक्रम आणि समर्पण सर्वांनाच प्रेरणा देणार आहे", असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे.
हिंडन एअरबेसवर फ्लाय पास्टची सुरुवात 'आकाशगंगा' म्हणजेच आकाशातून पॅरा-जम्पने झाली. या पॅरा-जम्पमध्ये हवाई दलाचे जवान ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टमधून पॅराशूटच्या मदतीने उडी मारल्या. यानंतर निशान-टोली सह सैनिक मार्च पास्ट करण्यात आले.
असा असणार कार्यक्रम
- हिंडन एअरबेसवर सकाळी 8 ते 11 पर्यंत हा कार्यक्रम असणार आहे.
- सकाळी 8 वाजता - परेडने सुरुवात.
- सकाळी 9 वाजता - हवाई दल प्रमुखांचे भाषण होईल.
- सकाळी 9.58 वाजल्यापासून 10.45 वाजेपर्यंत लखाऊ विमानांची प्रात्यक्षिके होतील.
हवाई दल दिनाच्या संचलनात राफेल विमानांचा सहभाग हवाई दल दिनाच्या संचलनात राफेल लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. १० सप्टेंबरला पाच राफेल लढाऊ विमाने भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आली होती. फ्रान्सच्या दसॉल्ट अॅव्हिएशनने ती तयार केली असून अचूक मारा करण्यात ती उपयोगी आहेत. एकूण ५९ हजार कोटी रुपयांचा करार ३६ राफेल विमानांसाठी करण्यात आला. आणखी पाच विमाने नोव्हेंबपर्यंत भारताला मिळणार आहेत.