नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने बुधवारी आणखी एक कठीण प्रयोग यशस्वी करुन दाखवला. विमान उड्डाणावस्थेत असताना एमब्रार एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम या विमानात आयएल-78 या टँकर विमानातून हवेतच इंधन भरण्याचा केलेला प्रयोग यशस्वी ठरला. एमब्रार एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (अवॉक्स) हे टेहळणी विमान असनू या विमानाला भारताचे आकाशातील नेत्र म्हटले जाते. या विमानात आता हवेतच इंधन भरणे शक्य असल्यामुळे टेहळणी क्षमतेमध्ये कैकपटीने वाढ होणार आहे.
विमान हवेत असताना एका विमानातून दुस-या विमानात इंधन भरणे सोपे नसते. त्यासाठी वैमानिकाला कौशल्य आणि अनुभवाची गरज लागते. इंधन भरताना दोन्ही विमानांची उंची, पातळी आणि उड्डाणामध्ये अचूकता लागते. हवेतल्या हवेत रिफ्युलिंग म्हणजे इंधन भरण्याला फक्त दहा मिनिट लागतात पण त्यामुळे अवॉक्स आणखी चार तास उड्डाण करु शकते.
ब्राझिलियन एमब्रार जेटवर बसवलेली एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केली आहे. भारतीय अवॉक्स प्रणाली बसवण्यासाठी ब्राझिलियन एमब्रार जेटमध्ये काही बदल करण्यात आले. यावर्षाच्या सुरुवातील या विमानाचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला. हवाई युद्धात ही प्रणाली गेमचेंजर ठरेल. मागच्या आठवडयात भारताने सुखोई विमानातून ब्राम्होस क्षेपणास्त्र डागून नवीन इतिहास रचला होता.
सुखोई फायटर जेटमधून सुपरसॉनिक ब्राह्मोस चाचणी भारताच्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची सुखोई-30एमकेआय फायटर जेट विमानातून घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. सुखोई-30एमकेआय हे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. ब्राह्मोसची सुखोईवरुन घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरल्यामुळे भारतीय हवाई दलाची शत्रू प्रदेशात खोलवर हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे.
ब्राह्मोस हे वर्ल्डक्लास क्षेपणास्त्र आहे. भारताकडे आता जमीन, समुद्र आणि हवेतून हे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. अचूकता आणि वेग हे ब्राह्मोसचे वैशिष्टय आहे. सुखोईमधून ब्राह्मोस डागल्यानंतर या क्षेपणास्त्राने बंगालच्या सागरातील आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. ब्राह्मोस आणि सुखोई हे कॉम्बिनेशन सर्वात खतरनाक असून शत्रू सैन्यासाठी धोक्याची घंटा आहे.