अंबाला : हरियाणाच्या अंबाला हवाईदलाच्या विमानतळावर लढाऊ विमानाचा अपघात टळला. जग्वारच्या या विमानाने गुरुवारी सकाळी 7.20 मिनिटांनी उड्डाण केले होते. मात्र, काही वेळातच विमानाला पक्षी आदळला यामुळे इंजिनाला नुकसान झाले. मात्र, वैमानिकाने युक्ती लढवत विमान सुरक्षितरित्या खाली उतरविले.
हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पायलटने शहराच्या बलदेव नगरमध्ये विमानाच्या बाहेरची इंधन टाकी आणि 10 किलोचा सरावासाठीचा बॉम्ब खाली टाकला. हा बॉम्ब ताब्यात घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे हवाईदलाच्या या अपघाताची कोर्टऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.
ही घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इंधनाची टाकीचे अवशेष पडल्यामुळे जोरात आवाज झाला. आम्ही झोपेत होतो. आवाजाने जाग झाली. आजुबाजुच्या घरांमध्ये हे अवशेष पडले. यामुळे भिंतींना तडे गेले. तर डीएसपी रजनीश शर्मा यांच्यासमवेत अनेक पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पायलटनी आपत्कालीन लँडिंग केली. तसेच अवशेष जमा करण्यात आले आहेत.
2016 पासून 33 विमाने अपघातग्रस्तहवाई दलाच्या विमानांचे वारंवार होणारे अपघात भारताच्या दृष्टीनं चिंतेचा विषय झाला आहे. 2015-16 पासून भारतीय हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त झाली आहेत. यामध्ये 19 लढाऊ विमानांचा समावेश आहे, अशी आकडेवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. रशियाकडून खरेदी करण्यात आलेलं एएन-32 विमान काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालं. त्याचीही माहिती राजनाथ यांनी सभागृहाला दिली. हवाई दलाच्या एएन-32 विमानाला 3 जून रोजी अपघात झाला. यामध्ये हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर एएन-32 विमानाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र एएन-32 विमानं अतिशय उपयुक्त असून ती यापुढेही हवाई दलाच्या सेवेत असतील, असं राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी 2015-16 पासून झालेल्या अपघातांचीही माहिती दिली. 2015-16 या वर्षात हवाई दलाची चार लढाऊ विमानं आणि प्रत्येकी एक हेलिकॉप्टर, वाहतूक विमान आणि प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान कोसळलं, असं राजनाथ यांनी सांगितलं.