अंबाला - भारतीय हवाई दलाचं IAF Jaguar विमानाचा आज सकाळी अंबाला एअरबेस स्टेशनवर मोठा अपघात टळला. विमानाच्या इंधन टाकीला पक्षी धडकल्याने त्याला आग लागली आणि इंधनाच्या टाकीचा काही भाग जमिनीवर कोसळला. मात्र पायलटने प्रसंगावधान राखत विमानाचं तातडीनं लॅंडिंग केले.
अंबाला हवाई क्षेत्राच्या हद्दीत ही घटना घडली. याठिकाणी कोणालाही जाण्याची परवानगी नाही. घटनास्थळी हवाई दलाचे अधिकारी पोहचले आहेत. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार सकाळी खूप मोठा आवाज ऐकायला आला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. विमान कोसळलं असं स्थानिक लोकांना वाटलं मात्र विमानाच्या इंधन टाकीचा काही भाग कोसळल्याचं पाहण्यात आलं. स्फोटाचा आवाज इतका होता की ज्या बलदेवनगर परिसरात इंधनाच्या टाकीचा भाग कोसळला तेथील घरांना तडे गेले. याआधीही 8 जून रोजी गोवा एअरपोर्टवर भारतीय नौदलाचे मिग 29 K विमानाच्या इंधनाची टाकी पडून विमान सेवेवर परिणाम झाला.