जयपूर: भारतीय हवाई दलाचं मिग-२१ विमान राजस्थानच्या सूरतगढमध्ये कोसळलं आहे. रात्री सव्वा आठच्या सुमारास हा अपघात घडला. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाल्याचं बोललं जात आहे. वैमानिक विमान कोसळण्यापूर्वी विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 'पश्चिम विभागात आज संध्याकाळी सराव सुरू असताना मिग-२१ विमानात मोठा तांत्रिक बिघाड झाला. यावेळी वैमानिकानं स्वत:ची सुखरुप सुटका करून घेतली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,' अशी माहिती हवाई दलानं ट्विटच्या माध्यमातून दिली.२०१६ पासून हवाई दलानं अपघातांत २७ विमानं आणि १५ लढाऊ विमानं गमावल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी २०१९ मध्ये संसदेत दिली. २०१६-१७ या वर्षात हवाई दलाची सहा लढाऊ विमानं, दोन हेलिकॉप्टर्स, एक वाहतूक विमान आणि एक प्रशिक्षण विमान दुर्घटनाग्रस्त झालं. तर २०१७-१८ मध्ये हवाई दलानं दोन लढाऊ विमानं आणि एक प्रशिक्षण विमान अपघातात गमावलं. २०१८-१९ मध्ये हवाई दलाची सात लढाऊ विमानं, दोन हेलिकॉप्टर्स आणि दोन प्रशिक्षण विमानं अपघातग्रस्त झाली.