चंदिगड - जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत हवाई दलाचे सहा सैनिक शहीद झाले होते. दरम्यान, या दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर सिद्धार्थ वशिष्ठ यांच्यावर पूर्ण सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हवाई दलात स्क्वॉड्रन लीडर असलेली त्यांची पत्नी आरती सिंह यांनी सिद्धार्थ यांना संपूर्ण गणवेशात निरोप दिला. आपल्या पतीला अखेरची सलामी देताना आरती सिंह यांना अश्रू आवरता आले नाहीत. हे दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. सिद्धार्थ वशिष्ठ आणि त्यांची पत्नी आरती सिंह हे दोघेही भारतीय हवाई दलामध्ये स्क्वॉड्रन लीडर पदावर कार्यरत होते. आरती सिंह या सुट्टी संपवून पुन्हा एकदा सीमारेषेवर जात होत्या त्यावेळीच सिद्धार्थ वशिष्ठ हे शहीद झाल्याची माहिती त्यांना मिळाली. दरम्यान, सिद्धार्थ यांचे पार्थिव गुरुवारी हवाई दलाच्या विमानातून चंदिगड येथे आणण्यात आले होते. सिद्धार्थ यांचे पार्थिव विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांची पत्नी आरती त्यांचे पार्थिव घेण्यासाठी हवाई दलाच्या गणवेशात तिथे पोहोचली होती. दरम्यान, सिद्धार्थ वशिष्ट यांच्यावर संपूर्ण सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ यांच्या वडिलांनी त्यांनी मुखाग्नी दिला. सिद्धार्थ वशिष्ठ यांच्या कुटुंबामध्ये सैनिकी परंपरा असून, त्यांच्या तीन पिढ्या देशसेवेमध्ये आहेत. स्क्वॉड्रन लीडर सिद्धार्थ वशिष्ठ हे 2010 साली हवाई दलात सामील झाले होते. गेल्या वर्षी केरळमध्ये आलेल्या महापुरावेळी त्यांनी बचाव कार्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
स्क्वॉड्रन लीडर पत्नीने शहीद पतीला दिला हवाई दलाच्या गणवेशात निरोप, उपस्थितांचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 4:28 PM