या वर्षाच्या अखेरीस राजस्थान विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. या निडवणुकीसाठी सर्वच पक्ष कंबरकसून कामाला लागले आहेत. यातच एक नवा सर्व्हे समोर आला आहे. यात काँग्रेसला दिलासा मिळताना दिसत आहे. या सर्वेक्षणानुसार राज्यात काँग्रेस पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते. मात्र असे असले तरी, या सर्व्हेतून भाजपलाही दोन बाबतीत दिलासा मिळताना दिसत आहे.
राजस्थानात पुन्हा कांग्रेसचं सरकार? -राजस्थान निवडणुकीपूर्वी आयएएनएस-पोलस्ट्रॅटने एक सर्व्हे केला आहे. यात 6705 लोकांना प्रश्न विचारण्यात आले. या सर्व्हेनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 200 पैकी 101 जागा मिळू शकतात. तर भाजपला 93 जागा मिळू शकतात. सर्व्हे नुसार काँग्रेसला 97 ते 105 जागा मिळू शकतात. तर भाजपला 89 ते 97 जागा मिळू शकतात.
सर्व्हेत CM गेहलोत आघाडीवर -या सर्व्हेत राजस्थानातील लोकांना, त्यांचा लोकप्रीय नेता कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राज्यातील 38 टक्के लोकांनी अशोक गेहलोत यांचे नाव सांगितले. तर 26 टक्के लोकांनी भाजप नेत्या वसुंधरा राजे यांचे नाव सांगितले. तसेच सचिन पायलट यांना राज्यातील 25 टक्के लोकांनी पसंती दर्शवली. तर 48 टक्के लोकांनी सीएम गेहलोत यांच्या कामांचे कौतुक केले आहे.
भाजपला दोन दिलासे -या सर्व्हेनुसार, भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत एकूण 40 टक्के मते मिळू शकतात. यापूर्वी 2018 मध्ये भाजपला 39 टक्के मतं मिळाली होती. अर्थात भाजपचे व्होट शेअरिंग एका टक्क्याने वाढू शकते. तसेच यावेळी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला 89 ते 97 जागांवर विजय मिळू शकतो. अर्थात सर्व्हेतील आकडे सत्य सिद्ध झाल्यास, विधानसभेत भाजप आमदारांच्या संख्येतही वाढ होऊ शकते.