आयएएस अमित कटारिया यांनी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात फक्त १ रुपया पगार घेतला होता. कटारिया हे हरियाणातील गुडगाव येथील एका अतिशय समृद्ध व्यावसायिक कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबाचा रिअल इस्टेट व्यवसाय दिल्ली-एनसीआरमध्ये पसरलेला आहे, ज्याचं वार्षिक उत्पन्न कोट्यवधींमध्ये आहे. ते त्यांचा कौटुंबिक व्यवसाय पुढे नेऊ शकले असते, परंतु त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिलं आणि नागरी सेवा निवडली.
२०१५ मध्ये अमित कटारिया हे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आले तेव्हा त्यांनी काळा चष्मा घातला होता. त्यामुळे तेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यावेळी अमित हे छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांची ही कृती प्रोटोकॉलविरुद्ध मानली गेली, ज्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री रमण सिंह यांनी त्यांच्याविरुद्ध नोटीस बजावली.
१ रुपये पगार घेण्याचा निर्णय
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अमित कटारिया नागरी सेवेत रुजू झाले तेव्हा त्यांनी फक्त १ रुपये पगार घेण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या या कृतीवरून असं दिसून येते की ते पैशापेक्षा देशसेवेला जास्त महत्त्व देतात.
अभ्यासात नेहमीच हुशार
अमित कटारिया यांनी दिल्ली पब्लिक स्कूल, आर.के. पुरम येथे शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केलं. अभ्यासात नेहमीच हुशार असलेल्या कटारियाने पदवीनंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. त्याच्या कठोर परिश्रमाचे चीज झालं आणि २००३ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँक १८ मिळवून आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांना छत्तीसगड केडर मिळालं.
भारतातील सर्वात श्रीमंत आयएएस
अमित कटारिया यांचं लग्न अस्मिता हांडा यांच्याशी झालं आहे, जी व्यवसायाने कमर्शियल पायलट आहे. या जोडप्याला प्रवासाची आवड आहे आणि ते अनेकदा त्यांचे प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. अमित कटारिया यांची एकूण संपत्ती सुमारे ८.९० कोटी रुपये आहे, ज्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत आयएएस अधिकारी बनले आहेत. खरी सेवा पैशापेक्षा मोठी असते आणि जर हेतू निश्चित असतील तर यश आपोआप तुमच्याकडे येईल हे अमित कटारिया यांच्यावरून स्पष्ट होतं.