तिरुवनंतपुरम: केरळमध्ये आलेल्या महापुरात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. पुरामुळे सर्वस्व गमावलेल्या अनेकांना योग्य वेळेत मदत पोहोचवण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. केरळमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम करणारे कृष्णा तेजादेखील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी योग्यवेळी योग्य ठिकाणी बचाव अभियान राबवल्यानं मोठी जीवितहानी टळली.कृष्णा तेजा यांनी प्रसंगावधान राखत पूर येण्याआधीच अनेकांना स्थलांतरित केलं. त्यांनी तीन दिवसांमध्ये जवळपास 2 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. 16 ऑगस्ट 2018 रोजी केरळचे अर्थमंत्री डॉक्टर थॉमस आणि कृष्णा तेजा यांची बैठक सुरू होती. मुसळधार पावसामुळे चेंगन्नूर और कुट्टानाड भागातील धरणं भरल्याची माहिती यावेळी त्यांना मिळाली. या धरणांचे दरवाजे लवकरच उघडले जाऊ शकतात, अशीही माहिती तेजा यांना मिळाली. पावसाचा जोर कायम असल्यानं धरणांचे दरवाजे उघडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे कुट्टानाडमध्ये भीषण परिस्थिती निर्माण होऊन हजारो लोकांचं जीवन संकटात सापडू शकतं, याचा अंदाज तेजा यांना आला. यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कुट्टानाडमध्ये ऑपरेशन सुरू केलं. तेजा आणि त्यांच्या टीमनं तब्बल दोन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. या ऑपरेशनमध्ये असंख्य अडचणी आल्या. मात्र बोटींच्या मदतीनं तेजा यांनी नागरिकांना निवारा केंद्रात हलवलं. तेजा यांच्या या कामाचं सध्या केरळमध्ये सर्वत्र कौतुक सुरू आहे. 220 लोकांची सात पथकं तयार करुन तेजा यांनी बचावकार्य पार पाडलं. यामध्ये एनडीआरएफनंदेखील महत्त्वाची कामगिरी बजावली.
Kerala Floods: देवभूमीतील देवदूत... २ लाख जणांचे प्राण वाचवणारा IAS अधिकारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 11:50 AM