दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अनेक मुलं निराश होतात. पण त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आयुष्य इथेच संपत नाही. दहावी आणि बारावी या दोन्ही परिक्षेत नापास झालेल्या एका यशस्वी व्यक्तीची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया. अपयश आलं पण तिने हार मानली नाही. जिद्दीने ती आयएएस अधिकारी झाली आहे. आयएएस अंजू शर्मा असं त्यांचं नाव आहे.
IAS अंजू शर्मा या राजस्थानच्या रहिवासी आहेत. अंजू शर्मा या 1991 च्या बॅचच्या अधिकारी गुजरात केडरमध्ये तैनात आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावेळी त्यांचं वय फक्त 22 वर्षे होतं. राजकोटमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेतील कारकिर्दीला सुरुवात केली.
अंजू शर्मा अभ्यासात हुशार होत्या. पण परीक्षेत गडबड करायच्या. यामुळे त्या दहावीच्या प्री बोर्ड परीक्षेत नापास झाल्या. यानंतर त्या पुन्हा एकदा बारावीत नापास झाल्या. मात्र, इंटरमिजिएटमध्ये त्या फक्त अर्थशास्त्र विषयात नापास झाल्या. उर्वरित सर्व विषयांमध्ये विशेष गुणांनी उत्तीर्ण झाल्या.
बारावीत नापास झाल्यानंतरही अंजू शर्मा यांच्या आईने त्यांना खूप साथ दिली. अंजू यांना समजलं की त्यांची अभ्यासाची तयारी करण्याची पद्धत योग्य नाही. म्हणूनच महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्यांनी सुरुवातीपासूनच त्याच्या उणिवांवर लक्ष केंद्रित केलं. राजस्थान विद्यापीठातून त्यांनी बीएससी आणि नंतर एमबीए केलं. कॉलेजमध्ये त्या सुवर्णपदक विजेत्या होत्या.
अंजू या सध्या गुजरातची राजधानी गांधीनगर येथे असलेल्या राज्य सचिवालयात शिक्षण विभागात (उच्च आणि तंत्रशिक्षण) मुख्य सचिव आहेत. कठोर परिश्रम आणि संयम यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांना कोणतंही काम नियोजनबद्ध पद्धतीने करायला आवडतं. आयएएस अंजू शर्मा यांचा प्रवास हे सिद्ध करतो की अपयश ही यशाची फक्त एक पायरी असते. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.