UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण होणं ही काही सोपी गोष्ट नाही. हजारो उमेदवार दरवर्षी जिद्दीने ही परीक्षा उत्तीर्ण होतात आणि यशाचा नवा अध्याय लिहितात. हरियाणाच्या आयएएस अधिकारी अंकिता चौधरी यांची सक्सेस स्टोरी समोर आली आहे. अंकिता यांनी परीक्षेची तयारी करताना आई गमावली होती, मात्र दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत 14 वा रँक मिळवून त्य़ा आयएएस झाल्या आणि आईला श्रद्धांजली वाहिली.
IAS अंकिता चौधरी हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील मेहम येथील रहिवासी आहेत. अंकिता यांचे वडील साखर कारखान्यात अकाऊंटंट आहेत आणि आई गृहिणी होती. इंडस पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून केमिस्ट्रीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. या काळातच यूपीएससीची तयारी सुरू केली आणि आयआयटी दिल्लीतून मास्टर डिग्री पूर्ण केल्यानंतर यूपीएससीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले.
अंकिता लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी स्वतंत्र आणि आत्मनिर्भर राहणे पसंत केले. अंकिता 2017 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसल्या पण त्या अपयशी ठरल्या, याच दरम्यान त्यांनी आपली आई देखील गमावली. या घटनेने अंकिता खूपच खचल्या होत्या पण त्यांनी हार मानली नाही आणि नंतर वडिलांच्या सांगण्यावरून प्रयत्न सुरू ठेवले. 2018 मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा UPSC परीक्षेला बसल्या आणि 14 व्या क्रमांकासह IAS होण्याचे स्वप्न साकार केलं.
अंकिता नेहमी सांगतात की, कोणत्याही विद्यार्थ्याने मुख्य परीक्षेसाठी आन्सर रायटींगचा सराव करणं खूप महत्त्वाचं असतं. अंकिता चौधरी सध्या सोनीपतमध्ये एडीसी म्हणून कार्यरत आहेत. यूपीएससी परीक्षेत त्यांचा ऐच्छिक विषय पब्लिक एडमिनिस्ट्रेशन हा होता. अंकिता ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. सोशल मीडिया साइट ट्विटरवर त्यांचे 24 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.