ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - कर्नाटकमधील आयएएस दर्जाच्या अधिका-याच्या मृत्यू प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हजरतगंज पोलिसांत अनुराग तिवारी यांच्या मृत्यू प्रकरणात अज्ञाताविरोधात हत्येचा भारतीय दंड विधान 302(हत्या)अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करणार आहे. तिवारी यांचे भाऊ मयांक यांच्या सूचनेवरून ही हत्येची तक्रार नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 35 वर्षांचे IAS दर्जाचे अधिकारी अनुराग तिवारी यांचा मृतदेह हजरतगंजमधील मीरा बाई या व्हीआयपी अतिथीगृहाबाहेर सापडला होता. तिवारी यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणामुळे झाल्याची शक्यताही त्यावेळी पोलिसांनी वर्तवली होती. तसेच शवविच्छेदन अहवालातून अनुराग तिवारी यांचा मृत्यू श्वसननलिका बंद पडल्यामुळे झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
मृत्यू होण्यापूर्वी तिवारी यांची बदली बंगळुरूमधल्या बहरिच जिल्ह्यात अन्न आणि नागरी पुरवठा आयुक्तपदी करण्यात आली होती. ते काही खासगी कामानिमित्त उत्तर प्रदेशात आले होते. त्यावेळी ते गेस्ट हाऊसच्या रूम नंबर 19मध्ये थांबले होते. तिवारी यांचे सहकारी सिंग यांनी त्यांच्यासाठी रूम बुक केली होती. तिवारी आणि सिंग हे दोघेही 2007मध्ये अधिकारी म्हणून सरकारी सेवेत रुजू झाले. ज्यावेळी सिंग बॅडमिंटन खेळण्यासाठी सकाळी 6 वाजता गोमतीनगर स्टेडिअममध्ये गेले, त्याच वेळी तिवारीही मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडले. गेस्ट हाऊसच्या रूमपासून 300 मीटरच्या अंतरावरील रोडवरच तिवारी कोसळले. रस्त्यावर काही रक्ताचे डागही आढळून आले होते. पोलिसांनी डीआयडी जे. एस. सिंग आणि एसएसपी दीपक कुमार यांना कळवल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. तिवारी यांना सामान्य रुग्णालयात भरती केले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. दीपक कुमार यांच्या मते, तिवारी यांना फीट आल्यामुळे ते कोसळले असावेत. मात्र आम्ही शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट पाहत आहोत. तिवारी यांचे कुटुंबीय दुपारी 12 वाजता लखनऊमध्ये दाखल झाल्याची माहिती सिंग यांनी दिली आहे. तिवारींना काही कौटुंबिक त्रास होता का, याचा आम्ही शोध घेत आहोत, असंही सिंग म्हणाले होते.