मोठ्या पगारासह मोठं पद मिळवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण त्यांच्यात असे बरेच लोक आहेत जे स्वतःचा वेगळा मार्ग स्वीकारतात. दरवर्षी लाखो लोक UPSC CSE परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या उद्देशाने बसतात, जी भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. परंतु यापैकी मोजकेच लोक आपले ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतात.
असे अनेक लोक आहेत ज्यांना चांगलं करिअर करण्याची इच्छा आहे, परंतु आयुष गोयल याची इच्छा या सर्वांपेक्षा वेगळी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीचा रहिवासी असलेल्या आयुष गोयलने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आणि देशाची सेवा करण्याच्या उद्देशाने 28 लाख रुपयांच्या मोठ्या पगारासह असलेली चांगली नोकरी सोडली.
आयएएस अधिकारी आयुष गोयलने दिल्ली सरकारच्या राजकिया प्रतिभा विकास विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॅट परीक्षेचा अभ्यास सुरू केला. CAT परीक्षा पूर्ण केल्यानंतर त्याने IIM कोझिकोड, केरळ येथे अर्ज केला. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, एमबीए पूर्ण केल्यानंतर, आयुष जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीत विश्लेषक म्हणून सामील झाला आणि त्याला 28 लाख रुपये वार्षिक पगार मिळाला.
20 लाखांचे कर्ज घेऊन केला अभ्यास
आयुषचे वडील सुभाष चंद्र गोयल हे किराणा दुकान चालवतात तर आई मीरा गृहिणी आहे. आयुषला शिक्षणासाठी 20 लाखांचे कर्ज मिळाले होते. आयुषला नोकरी लागली तेव्हा त्याच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला होता पण मुलाच्या निर्णयाने त्यांच्या आनंदाला तडा गेला होता. आठ महिन्यांनी आयुषने ही नोकरी सोडली. यानंतर त्याला आपले संपूर्ण लक्ष यूपीएससी परीक्षेवर केंद्रित करायचे होते. तो UPSC परीक्षा 171 व्या रँकसह उत्तीर्ण झाला.
दिल्ली विद्यापीठातून घेतली पदवी
आयुषला दहावीच्या बोर्ड परीक्षेत 91.2% आणि १२वी बोर्ड परीक्षेत 96.2% गुण मिळाले होते. आयुषने दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. एवढी चांगली पगाराची नोकरी सोडल्यानंतर त्याला अभ्यासाचे खूप दडपण जाणवले. मात्र तो यूपीएससी परीक्षेसाठी रात्रंदिवस अभ्यासात व्यस्त होता.
यशासाठी अशी तयार केली रणनीती
आयुषने यूपीएससीसाठी दीड वर्ष घरीच अभ्यास केला. यासाठी त्याला कोणतेही प्रशिक्षणही मिळाले नाही. दिवसातील आठ ते दहा तास तो इंटरनेटवरचे व्हिडिओ पाहून, पुस्तके वाचून सतत अभ्यासात घालवत असे. पहिल्याच प्रयत्नात त्याला यश आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.