नवी दिल्ली: राजधानी दिल्लीशी संबंधित एक प्रकरण गेल्या वर्षी खूप चर्चेत आले होते. एका IAS जोडप्याने त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी अख्खे स्टेडियम रिकामे करायला लावले होते. आता याप्रकरणी एक आयएएस अधिकाऱ्यावर सरकारने मोठी कारवाई केली आहे. सरकारने त्या अधिकाऱ्याला सक्तीच्या सेवानिवृत्तीचे आदेश दिले आहेत.
अरुणाचल प्रदेश सरकारमध्ये सेवेत असलेल्या आयएएस अधिकाऱ्याला केंद्र सरकारने सक्तीची सेवानिवृत्ती दिली आहे. रिंकू दुग्गा असे या महिला IAS अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या AGMUT (अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम केंद्रशासित प्रदेश) कॅडरच्या 1994 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्या सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये स्वदेशी व्यवहार खात्यात प्रधान सचिव म्हणून तैनात आहेत. त्यांचे पती संजीव खिरवार हेदेखील 1994 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते सध्या लडाखमध्ये तैनात आहेत.
गेल्यावर्षी या दाम्पत्याने त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी दिल्लीचे त्यागराजा स्टेडियम रिकामे करायला लावले होते. यावरुन मोठा वाद झाल्यानंतर संजीव खिरवार यांची लडाखला तर त्यांच्या पत्नीची अरुणाचल प्रदेशात बदली करण्यात आली. आता, केंद्रीय नागरी सेवा (CCS) पेन्शन नियम, 1972 च्या नियम (FR) 56 (J), नियम 48 अंतर्गत दुग्गा यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले आहे. त्यांचा सर्व्हिस रेकॉर्ड पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.